Maharashtra Election 2019 ; उमेदवारांकडून मनधरणी; अपक्ष लागणार गळाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:52+5:30
अमरावती मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा खोडके व भाजपचे सुनील देशमुख यांच्यात थेट लढत होत असली तरी रिंगणात अद्याप २५ उमेदवार आहेत. येथे अपक्षांद्वारे मतविभाजनाचा धोका आहेच. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व सेनेचे राजेश वानखडे यांच्यात सरळसरळ लढत होत असली तरी या उमेदवारांसह १६ जण कायम आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील आठही मतदारसंघांमध्ये सोमवारी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सद्यस्थितीत रिंगणातील १५१ उमेदवारांमध्ये शंभरावर अपक्ष आहेत. मतविभाजनाचा धोका टाळण्यासाठी प्रमुख राजकीय उमेदवारांकडून अपक्षांची मनधरणी होत आहे. यामध्ये किती अपक्ष गळाला लागणार, याचे चित्र सोमवारी दुपारनंतर स्पष्ट होईल.
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार असले तरी प्रमुख लढत काँग्रेसचे वीरेंद्र जगताप व भाजपचे प्रताप अडसड यांच्यात राहील. या ठिकाणी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांचे पती प्रवीण घुईखेडकर व निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा साथ घेणारे काँग्रेसचे नीलेश विश्वकर्मा तसेच भाजपची उमेदवारी मिळाली नाही म्हणून अपक्ष रिंगणात असलेले अभिजित ढेपे यांच्यासह अपक्षाची भाऊगर्दी आहे. यापैकी किती माघार घेतात, हे सोमवारी दुपारनंतर स्पष्ट होईल. बडनेरा मतदारसंघात अपक्ष रवि राणा व सेनेच्या प्रीती बंड यांच्यात थेट लढत होत असली तरी २८ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी किती अपक्षांची माघार होते, हेदेखील महत्वाचे आहे.
अमरावती मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा खोडके व भाजपचे सुनील देशमुख यांच्यात थेट लढत होत असली तरी रिंगणात अद्याप २५ उमेदवार आहेत. येथे अपक्षांद्वारे मतविभाजनाचा धोका आहेच. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व सेनेचे राजेश वानखडे यांच्यात सरळसरळ लढत होत असली तरी या उमेदवारांसह १६ जण कायम आहेत. यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार शरद तसरे यांचे पुत्र भारत तसरे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
दर्यापूर मतदारसंघात भाजपचे रमेश बुंदिले यांच्यासमोर बंडखोर सीमा सावळे यांचे आव्हान आहे. त्यांची थेट लढत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्याशी होत आहे. मात्र, २० उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी किती उमेदवार माघार घेतात, याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे.
मेळघाटात भाजपचे रमेश मावस्कर, राष्ट्रवादीचे केवलराम काळे व निवडणुकीच्या तोंडावर प्रहारचा घरठाव करणारे राजकुमार पटेल यांचे आव्हान आहे. येथे १० उमेदवारांपैकी किती माघार घेतात, यावर मतविभाजन ठरेल. अचलपूर मतदारसंघात प्रहारचे बच्चू कडू चौथ्यांदा रिंगणात आहेत. त्यासमोर काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख व सेनेच्या सुनीता फिस्के यांचे आव्हान आहे. विशेष म्हणजे, रिपाइंचे राजेंद्र गवई यांचादेखील उमेदवारी अर्ज असल्याने राजकारणात टिष्ट्वस्ट आला आहे. येथे १५ पैकी किती उमेदवार माघार घेतात, याकडे लक्ष लागले आहे. मोर्शी मतदारसंघात भाजपचे अनिल बोंडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांच्यात थेट लढत अपेक्षित असली तरी १४ पैकी किती उमेदवार माघार घेतात, यावर मतविभाजनाचे गणित ठरणार आहे.
१५ हून अधिक उमेदवार असल्यास दोन बीयू
आयोगाचे बॅलेट युनिट (बीयू) वर १५ उमेदवार व १ नोटा अशा १६ नोंदी राहू शकतात. त्यामुळे सोमवारी किती उमेदवार माघार घेतात, यावर बीयूचे गणित ठरणार आहे. अचलपूर मतदारसंघात १५, मोर्शी मतदारसंघात १४, मेळघाट मतदारसंघात १० उमेदवार आहेत. याव्यतिरिक्त तिवसा मतदारसंघात १६ उमेदवार आहेत. यापैकी एकाची माघार निश्चित आहे. त्यामुळे या ठिकाणी एकाच बीयूवर काम होईल. मात्र, अमरावती मतदारसंघात २५, बडनेरा मतदारसंघात २८, दर्यापूर मतदारसंघात २० व धामणगाव मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात आहे. येथे किती उमेदवार माघार घेतात, यावर बीयूचे गणित अवलंबून आहे.
चिन्ह वाटपात होणार तू-तू, मै-मै!
निवडणूक प्रक्रियेनुसार सोमवारी दुपारनंतर सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ठरावीक चिन्हांसाठी नोंदणी नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार दावा करण्यात येणार आहे. निवडणूक विभागाच्या माहितीनुसार प्रथम राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे उमेदवार व त्यानंतर विनानोंदणी, मात्र आमदार असलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर अपक्षांची वर्णी लागेल. यावेळी लोकसभा निवडणुकीप्रमाणे राजकीय ड्रामा होण्याचे काही मतदारसंघांमध्ये संकेत आहेत. निवडणूक विभागाने चिन्हवाटपासाठी जय्यत तयारी आहे.
प्रचारासाठी अवघे १२ दिवस
आठही मतदारसंघात ७ आॅक्टोबरला चिन्हवाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत वाढणार आहे. २१ तारखेला मतदान आहे. त्याच्या दोन दिवसांपूर्वी जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी फक्त १२ दिवसच मिळणार आहेत. या दरम्यान तीन लाखांवर मतदार व किमान २०० गावांपर्यंत पोहोचण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. त्यामुळे दररोज किमान २५ ते ३० हजार मतदारांपर्यंत पोहचण्याचे नियोजन उमेदवारांना करावे लागेल. याव्यतिरिक्त सभा, बैठकांमध्येही उमेदवार व्यस्त राहणार आहेत. त्यासाठी तहान-भूक हरपून श्रम घ्यावे लागणार आहेत.