Maharashtra Election 2019 ; गर्दीच्या साक्षीने अनिल बोंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:41+5:30
अनिल बोंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. राज्याचा कृषिमंत्री म्हणून मतदारसंघाचा चेहरामोहरा पालटविण्यात आपण यशस्वी ठरलो. जी कामे राहिलीत, ती जलदगतीने पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी गुरुवारी मोर्शी उपविभागीय महसूल कार्यालयात प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत मोर्शी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार प्रवीण पोटे, माजी खासदार अनंत गुढे, डॉ. वसुधा बोंडे यांची उपस्थिती होती. सजविलेल्या बैलगाडीत बसून अनिल बोंडे यांनी मोर्शीकरांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या रॅलीत सुमारे ३० ते ४० हजार कार्यकर्ते, मोर्शीकर प्रचंड उत्साहात सहभागी झाले.
अनिल बोंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. राज्याचा कृषिमंत्री म्हणून मतदारसंघाचा चेहरामोहरा पालटविण्यात आपण यशस्वी ठरलो. जी कामे राहिलीत, ती जलदगतीने पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी भाजपसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्शी, वरूड व शेंदूरजनाघाट या तिन्ही पालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, भाजप संघटनेतील पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.
तत्पूर्वी, रामजीबाबा मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली. सजविलेल्या बैलगाडीतून अनिल बोंडे यांनी मतदारांना अभिवादन केले. याप्रसंगी तुम्हा सर्वांच्या सहकार्याने विजयाची हॅट्ट्रिक साधणार, असा आशावाद मतदारांना संबोधित करताना अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. गुजरी बाजार, मंत्री मार्केट मार्गे ही रॅली तहसील कार्यालयात पोहोचली. यावेळी मोर्शीचे रस्ते भगव्या गर्दीने फुलून गेले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोंडे यांनी शिवाजी शाळेच्या बाजूच्या प्रांगणात मतदारांशी संवाद साधला.