Maharashtra Election 2019 ; मुख्यमंत्री माझ्यासोबत - रवि राणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:55+5:30
४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजापेठ चौकातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेऊन दाखवावी किंवा माझ्याविरुद्ध बोलून दाखवावे, असे जाहीर आव्हान दिले होते, असे राणा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या प्रचार सभेत माझ्याविरुद्ध टीका करावी, यासाठी शिवसेनेच्या मंडळींनी शक्य ते सर्व प्रयत्न केलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ अमरावतीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे त्यांनी न बोलताच मला पाठिंबा दिला, असा दावा करीत मुख्यमंत्री हे माझे चांगले मित्र असून, ते माझ्यासोबतच आहेत, असे वक्तव्य बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवि राणा यांनी बुधवारी बडनेराच्या जुनीवस्तीतील बारीपुरा येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत केले.
बारीपुरा येथे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. रवि राणा म्हणाले की, मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी माझ्या कार्यशैलीचा अनुभव घेतला आहे. मी अपक्षांच्यावतीने फडणवीस सरकारला पाठिंबाही जाहीर केला होता. पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी बडनेरा मतदारसंघातील विकासकामांसाठी भरीव निधी दिला. माझ्यासारखा आमदार विधानसभेत असावा, ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. त्यामुळेच अमरावती येथील नेहरू मैदानावर बुधवारी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध शब्दही उच्चारला नाही. न बोलता त्यांचा मला पाठिंबा आहे. मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या दिलेला हा संदेश असल्याचा दावा राणा यांनी केला आहे.
४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजापेठ चौकातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेऊन दाखवावी किंवा माझ्याविरुद्ध बोलून दाखवावे, असे जाहीर आव्हान दिले होते, असे राणा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या प्रचार सभेत माझ्याविरुद्ध टीका करावी, यासाठी शिवसेनेच्या मंडळींनी शक्य ते सर्व प्रयत्न केलेत. मी दिलेल्या आव्हानाचा हवाला देऊन, मुख्यमंत्र्यांनी तसे वक्तव्य करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही राणा यांनी केला. माझे मित्र असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथे आल्यानंतर महायुतीच्या प्रचार सभेत ना माझ्या नावाचा उल्लेख केला, ना माझ्याविरुद्ध प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टीका केली. मुख्यमंत्री माझ्यासोबत आहेत, हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा दावा रवि राणा यांनी जाहीर सभेतून केला.