Maharashtra Election 2019 ; निवडणुकीचा ‘फिव्हर’ वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:00 AM2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:51+5:30
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसेतसे पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उमेदवारांचे विविध घटकही प्रचारात सहभागी होत आहेत. यामध्ये महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, किरकोळ व्यावसायिक व अन्य मंडळी आपापल्या उमेदवारांंना पाठिंबा देऊन प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. यामुळे प्रचार कार्यालयातही गर्दी वाढत असल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.
अमरावती : दसरा सण आटोपताच जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत प्रचाराने वेग घेतला आहे. निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार जोरकस प्रचाराला लागले आहेत. उमेदवारी न मिळालेले अनेकजण समर्थक उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. यामुळे आठही मतदारसंघांत निवडणूक ज्वर तापला आहे. विजयादशमीनंतर खऱ्या अर्थाने राजकारणाचे रण पेटले असून, परस्परांवर टीका, आक्षेप नोंदविले जात आहेत. कुणी विकासकामांचा पाढा वाचत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, तर पाटी कोरी असलेले उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहेत. यंदा आमदारकी मिळवायचीच, या ईर्ष्येने पेटलेल्या उमेदवारांनी सर्वस्व पणाला लावले आहे.
सोशल मीडियावर प्रचाराचे अपडेट
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे कार्यकर्ते सोशल मीडियावरही प्रचारपत्रकाबरोबर प्रचारातील अपडेट फोटो व्हॉट्सअॅप, फेसबूक अशा समाज माध्यमांवर टाकून एकाच वेळी अनेक मतदारांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करीत आहेत. हायटेक प्रचार यंत्रणेवर उमेदवारांसह कार्यकर्तेही पसंती देत आहेत.
कुटुंबही प्रचारात
प्रचारकार्यात उमेदवारांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीय, विविध संस्थांचा कर्मचारी वर्गही सक्रिय झाला आहे. मतदार याद्यांची गावनिहाय जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली आहे. घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष भेट व प्रचारावर प्रत्येकाचा भर आहे.
अनेकांचा प्रचारात सहभाग
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसेतसे पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उमेदवारांचे विविध घटकही प्रचारात सहभागी होत आहेत. यामध्ये महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, किरकोळ व्यावसायिक व अन्य मंडळी आपापल्या उमेदवारांंना पाठिंबा देऊन प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. यामुळे प्रचार कार्यालयातही गर्दी वाढत असल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.
मतदार याद्यांचे अवलोकन
मतदारसंघात येणाऱ्या गावांची नावे नक्की केल्यानंतर मतदार यादीची पडताळणी व त्यानंतर कुणाची नावे आहेत, कुणाची नाहीत, याचा शोध उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात जबाबदार पदाधिकारी घेत आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले जात आहे. विशेष म्हणजे, एकगठ्ठा मते विविध प्रकारच्या माध्यमातून आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न चालविले आहेत. याकरिता निकटवर्तीयांचीही मदत उमेदवाराकडून घेतली जात असल्याचे चित्र विविध मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.