Maharashtra Election 2019 ; मतदान कर्तव्यासाठी दिव्यांग मतदारांना मोफत ऑटोरिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:00 AM2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:45+5:30
शहर अभियंता रवींद्र पवार, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहायक आयुक्त अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उपअभियंता श्यामकांत टोपरे व मनोहर धजेकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता स्वप्निल जसवंते, अक्षय निलंगे बैठकीला उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुकीत सर्वांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, मतदानापासून कुणी वंचित राहु नये, या हेतूने दिव्यांग, बहुविकलांग मतदारासाठी महानगरपालिकेतर्फे मोफत ऑटोरिक्षा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.
शहर अभियंता रवींद्र पवार, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहायक आयुक्त अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उपअभियंता श्यामकांत टोपरे व मनोहर धजेकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता स्वप्निल जसवंते, अक्षय निलंगे बैठकीला उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ आॅक्टोबरला होत आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना सर्व आवश्यक सुविधा विशेषत: रॅम्प, व्हीलचेअर, वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. दिव्यांगांचा घरापासून मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत महानगरपालिका परिक्षेत्रातील मतदारांसाठी मोफत आॅटोरिक्षा सेवा तसेच मनपा अँम्ब्यूलन्स वाहनचालकांकडून मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या राहणार सुविधा
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता अँम्ब्यूलन्सची व्यवस्था सहा ठिकाणाहून करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर व्हीलचेअरचे नियोजन करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर प्रथमोपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. सहा ठिकाणी मोबाइल टॉयलेट व्हॅन ठेवण्यात येणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या शाळेत फर्निचर तसेच पाण्याची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर बालसंगोपन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
दिव्यांग, बहुविकलांग मतदारांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता यावे, यासाठी मोफत वाहनसेवा पुरविण्यात येईल व स्वयंसेवक नियुक्ती करण्यात येणार आहे
- संजय निपाणे, आयुक्त महापालिका