Maharashtra Election 2019 ; कमी टक्केवारीचे चिंतन करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:59+5:30
जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार मतदानाचा टक्कावाढीसाठी शासन, प्रशासन स्तरावर जोरकस प्रयत्न झाले. वास्तविकत: अमरावती जिल्ह्यात ६०.५७ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचे प्रशासन स्तरावर चिंतन केले जाईल. काय उणिवा राहिल्यात, याबाबत योग्य ती दिशा ठरविली जाईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, आठही मतदारसंघांत केवळ जिल्ह्याची टक्केवारी ६०.५७ एवढ्यावर थांबली आहे. मतदानाची कमी टक्केवारी ही प्रगल्भ लोकशाहीसाठी मारक ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त के ले. विशेषत: अमरावती मतदारसंघात ४९.४३ तर, बडनेरा मतदारसंघात ५२.०७ एवढी मतदानाची टक्केवारी ही चिंतनीय आहे.
या दोन्ही मतदारसंघांत थोडेफार ग्रामीण भाग असून, बहुतांश शहरी भाग असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असे निवडणुकीअगोदरचे चित्र होते. मात्र, शहरी भागात मतदारांनी मतदानाकडे का पाठ दाखविली, याचे प्रशासन स्तरावर चिंतन केले जाणार असल्याची ग्वाही जिल्हा निवडणूक अधिकारी नवाल यांनी सांगितले. शाळांमधून विद्यार्थ्यांच्या पाल्यांकडून मतदान करण्याविषयी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. मतदार जनजागृतीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. असे असताना मतदानाची कमी टक्केवारी ही प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. परिणामी मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत प्रशासन स्तरावर मंथन केले जाईल. मतदानाच्या वाढीव टक्केवारीसाठी भविष्यात कोणत्या उपाययोजना करता येतील, या दिशेने प्रयत्न केले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला.
मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मतमोजणी केंद्रावर जामर बसविण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे तसे कोणतेही आदेश नाहीत. अमरावती जिल्ह्यात आठही मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांवर जामर लागणार नाही, ही बाब जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केली आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने कडेकोट सुरक्षा असणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे नवाल यांनी सांगितले.