Maharashtra Election 2019 ; राणांचा बडनेऱ्यात नवा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:48+5:30
२००९ ते २०१९ या निवडणुकांमध्ये रवि राणा यांना विजय खेचून आणता आला. त्यावेळीही निवडणूक कठीण होती; परंतु राणांनी ती जिंकली. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या प्रीती बंड होत्या. मुद्दा भावनिकतेकडे वळल्यामुळे राणा यांची यावेळी कसोटी होती. संयमाने नियोजन, आखणी करण्याचे कौशल्य अंगी बाळगून असलेल्या राणांनी यावेळच्या आगळ्या समस्येवरही चाणाक्षपणे मात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयी झालेले अपक्ष आमदार रवि राणा यांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. बडनेºयात यापूर्वी कुणीही सलग दोनपेक्षा अधिक वेळा निवडून आलेले नव्हते. राणांनी हा शिरस्ता मोडून विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा १५५४१ मतांनी पराभव केला.
२००९ ते २०१९ या निवडणुकांमध्ये रवि राणा यांना विजय खेचून आणता आला. त्यावेळीही निवडणूक कठीण होती; परंतु राणांनी ती जिंकली. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या प्रीती बंड होत्या. मुद्दा भावनिकतेकडे वळल्यामुळे राणा यांची यावेळी कसोटी होती. संयमाने नियोजन, आखणी करण्याचे कौशल्य अंगी बाळगून असलेल्या राणांनी यावेळच्या आगळ्या समस्येवरही चाणाक्षपणे मात केली. १५५४१ मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणला.
खासदार पत्नीचाही विजयात वाटा
आमदार रवि राणा यांना यावेळची निवडणूक सावधपणे लढावी लागेल, अशी चर्चा सर्वत्र असताना, निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी 'रवि भैया को बीस हजार वोटों से जित के लाना ये मेरी जिम्मेदारी हैं' अशा शब्दांत ‘लोकमत’शी बोलताना जबाबदारी स्वीकारली होती. यावेळी निश्चित नियोजनानुसार पहिल्यांदा रवि राणा यांनी आणि त्यानंतर अखेरच्या टप्प्यात खासदार नवनीत राणा यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. विजयामागे रवि राणा यांचे निवडणूक लढण्याचे कौशल्य असले तरी पत्नी नवनीत यांचाही मोठा सहभाग आहे.
राणा दाम्पत्य झाले आमदार-खासदार
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा या दाम्पत्याने सन २०१९ मध्ये सहा महिन्यांच्या अवधीत झालेल्या अनुक्रमे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय खेचून आणला आहे. एकाच कालावधीत आमदार-खासदार होणारे राणा दाम्पत्य एकमेव ठरले आहे. एकाचवेळी आमदार, खासदार होण्याचा बहुमान राणा दाम्पत्याला मिळाला आहे. यापूर्वी शेखावत कुटुंबात देवीसिंह शेखावत यांना आमदार, तर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना खासदार होता आले. मात्र, हे काही वर्षांच्या अंतराने हे साध्य झाले. एकाच घरात आमदार-खासदार शेखावत दाम्पत्यानंतर राणा दाम्पत्याला होता आले, हे विशेष.