Maharashtra Election 2019 ; पोलिसांचे 'मिशन विधानसभा' यशस्वी; स्ट्राँग रूमवर कडेकोट पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:50+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर गणेशोत्सव, दुर्गात्सव व विधानसभा निवडणुकीच्या क्रमात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले नाही. त्यात विधानसभा ही पोलिसांसाठी अग्निपरीक्षाच होती. लोकसभेच्या वेळी पोलिसांनी पूर्वतयारी केली होती, गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू केला होता. प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी, एमपीडीए, रेकॉर्डवरील आरोपींची धरपकड, कोम्बिंग ऑपरेशन, फिक्स पॉइंट, पेट्रोलिंग अशा पद्धतीचे नियोजन पोलिसांचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची शिस्तशीर कार्यप्रणाली ‘मिशन विधानसभा’ यशस्वी करून गेली. शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या नियोजनबद्ध पोलिसिंगमुळे विधानसभा शांततेत पार पडली.
लोकसभा निवडणुकीनंतर गणेशोत्सव, दुर्गात्सव व विधानसभा निवडणुकीच्या क्रमात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले नाही. त्यात विधानसभा ही पोलिसांसाठी अग्निपरीक्षाच होती. लोकसभेच्या वेळी पोलिसांनी पूर्वतयारी केली होती, गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू केला होता. प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी, एमपीडीए, रेकॉर्डवरील आरोपींची धरपकड, कोम्बिंग ऑपरेशन, फिक्स पॉइंट, पेट्रोलिंग अशा पद्धतीचे नियोजन पोलिसांचे होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कुठल्याही अप्रिय घटना घडली नाही. मध्यंतरी अचलपुरात तिहेरी हत्याकांड घडले. मात्र, पोलीस अधीक्षकांनी स्वत: उपस्थित राहून तेथील तणावाची स्थिती हाताळली. परिणामी विधानसभा निवडणुकीत तेथे कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही.
पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रचंड व तडगा बंदोबस्त लावून आव्हान पेलले. मतमोजणीच्या वेळी स्ट्राँग रूमच्या खड्या पहाऱ्याने त्याची चुणूक दिली. याशिवाय निकालाच्या दिवशी अमरावती शहरातील सर्व उमेदवारांचे निवासस्थान व कार्यालयांना सकाळपासून चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती.
विजयी मिरवणुकीला कवच
विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके, तर बडनेरा मतदारसंघातून रवि राणा यांनी विजयाची पताका उंचावली. मतमोजणीदरम्यान खोडके व रवि राणा यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला होता. जल्लोषात कुठल्याही प्रकारे व्यत्यय येऊ नये, याकरिता पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली. दोन्ही विजयी उमेदवारांच्या घरी व कार्यालयात उत्साह दाटून आलेल्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यांनाही सुरक्षा कवच पोलिसांनी पुरविले.