Maharashtra Election 2019 : शहरात दोन हजार पोलिसांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:21 AM2019-10-15T01:21:29+5:302019-10-15T01:21:52+5:30
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये किंवा अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर तब्बल दोन हजारांवर पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. केंद्रीय पोलीस दलाच्या तीन कंपन्यांसह मध्य प्रदेश व महाराष्ट्रभरातून ८०० होमगार्डसुद्धा बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. भयमुक्त व पारदर्शक निवडणूक व्हावी, या उद्देशाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नेतृत्वात तडगा बंदोबस्त तैनात राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये किंवा अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. शहर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त व उपायुक्त यांच्या नेतृत्वात १० सहायक आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक, १०० सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि १ हजार ८०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे. याव्यतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून पुरविलेला मध्य प्रदेशातील ४०० व महाराष्ट्रातील ४०० होममार्ड, दोन डिवायएसपी, पाच पोलीस निरीक्षक, २० पीएसआय व एपीआय, केंद्रीय पोलीस दलाच्या तीन कंपन्या मदतीला राहणार आहेत. पोलिसांची चारचाकी व दुचाकी वाहने असे तब्बल १५० वाहने आपआपल्या हद्दीत सतत गस्तीवर राहणार आहेत. कुठेही अप्रिय घटना घडल्यास पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.