महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: माझी स्पर्धा अडसुळांशी नव्हती, मोदींशी होती! - नवनीत राणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:40 PM2019-05-24T12:40:29+5:302019-05-24T12:41:30+5:30
गेली दोन टर्म खासदार असणारे आनंदराव अडसूळ यांचा जनसंपर्क कमी पडला. सर्वसामान्य लोकांसाठी आनंदराव उपलब्ध होत नव्हते असं नवनीत राणा यांनी सांगितले.
अमरावती - लोकसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. गुरुवारी घोषित झालेल्या निकालात लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना केंद्रातील सत्तेची चावी दिली आहे. राज्यातही शिवसेना-भाजपा युतीने चांगलं यश मिळविलं. अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि आघाडी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांच्यात मुख्य लढत होती. या लढतीत नवनीत राणा यांनी बाजी मारत अमरावतीचा गड शिवसेनेकडून ताब्यात घेतला. यावेळी माझी स्पर्धा अडसुळांशी नव्हती तर मोदींशी होती अशी प्रतिक्रिया विजयी झाल्यानंतर नवनीत राणा यांनी दिली आहे.
अमरावतीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून नवनीत राणा यांनी मतांमध्ये आघाडी घेतली होती. या मतदारसंघात गेली अनेक वर्ष आमदार रवी राणा युवा स्वाभिमानच्या माध्यमातून लोकांची कामं करत होती. गेली दोन टर्म खासदार असणारे आनंदराव अडसूळ यांचा जनसंपर्क कमी पडला. सर्वसामान्य लोकांसाठी आनंदराव उपलब्ध होत नव्हते असं नवनीत राणा यांनी सांगितले.
तसेच येणाऱ्या काळात अमरावतीत विमानतळ आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचसोबत माझ्या विजयात मोठा वाटा अमरावतीतील महिलांचा आहे. त्यांच्यासाठी काम करणार आहे. अमरावती दारुमुक्त करण्यासाठी पाऊलं उचलणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांचे निकालानंतर देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार हे स्पष्ट झालं आहे. मागील लोकसभा निवडणुकीत एनडीएने ३३६ जागा जिंकल्या होत्या, त्यात भाजपाचा २८२ जागांचा वाटा होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वत:च्या जागा तर ३०० पार केल्या, शिवाय रालोआचे संख्याबळ ३५० वर नेऊन पोहोचविले. तेलगू देसमने गेल्यावेळी आंध्र प्रदेशात ३० उमेदवार उतरवून १६ जागा जिंकल्या होत्या. त्याचा बॅकलॉग यावेळी बिहारात अवघ्या १७ जागा लढविलेल्या जेडीयूने १६ जागा जिंकून भरून काढला. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २४ घटकपक्ष मैदानात उतरले होते. यावेळी २१ घटक पक्षांनी निवडणूक लढविली. यावेळी सामील झालेल्या नवीन १२ घटक पक्षाचा फायदा मिळाला.