महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेलगत वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:16 AM2018-11-26T01:16:30+5:302018-11-26T01:16:49+5:30
मेळघाटला अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणाने ग्रासले असतानाच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाभागात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. या अवैध वृक्षतोडीची भयावहता बघता, दोन्ही राज्यांतील वनअधिकाºयांच्या बैठकांवर प्रश्नचिन्ह लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटला अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणाने ग्रासले असतानाच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाभागात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. या अवैध वृक्षतोडीची भयावहता बघता, दोन्ही राज्यांतील वनअधिकाºयांच्या बैठकांवर प्रश्नचिन्ह लागले आहेत.
मध्यप्रदेश वनविभागाच्या अधिकाºयांनी महाराष्ट्रात परतवाडा-बहिरम रोडवरील निंभोरा फाट्याजवळ तीन ते चार लाखांचे अवैध सागवान पकडले. यानंतर जारिदा वनपरिक्षेत्रातून आलेला मालही याच वनअधिकाºयांनी पकडला. त्यांनी आरोपींना अटकही केली. याची माहिती महाराष्ट्र वन अधिकाºयांना दिली. मध्य प्रदेशातील कुकरू-खामला रेस्ट हाऊसवर पार पडलेल्या दोन्ही राज्यांतील समन्वय बैठकीत यावर चर्चाही झाली.
पूर्व मेळघाट वनविभागाच्या डीएफओ पीयूषा जगताप प्रसूती रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार अविनाशकुमार यांच्याकडे आहे. काही दिवस एसीएफ सानप यांच्याकडेही डीएफओंचा प्रभार होता. प्रादेशिक वनविभागाला चार महिन्यांपासून नियमित डीएफओ नाहीत. मिणा गेल्यानंतर मोबाइल डीएफओ हरिश्चंद्र वाघमोडे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार होता. आता वर्किंग प्लॅनचे डीएफओ संजय दहिवले यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
व्याघ्र प्रकल्पातही वृक्षतोड
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या वनक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आहे. सिपना वन्यजीव विभागाच्या पाचडोंगरी, कोयलारी, कन्हेरी, घाना बीटमधील वृक्षतोड नजरेत भरण्यासारखी आहे. उल्लेखनीय ठरली आहे. प्रादेशिक वनविभागाच्या सीमेलगत व्याघ्र प्रकल्पांतर्गत वृक्षतोड असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला अतिक्रमणाने ग्रासले आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे.
४० किलोमीटरची सीमा
वृक्षतोडीनंतर लाकूड वाहून नेण्यासाठी बैलांचा उपयोग घेतला जातो. ससोदा, बºहाणपूर, बानूर, धोत्रा, पाटोली, जांम्बुलडी, आडऊंबर, जनुना, पाळा, धाबा, खुमई, लामघाटी, पलासखेडी, बामादेही, निंभोरा या मध्यप्रदेशतील गावालगतच्या जंगलातून सागवान वृक्षांची अवैध कत्तल होत आहे. यातील आडउंबर, जाम्बुलडी, पाटोली जंगलात वृक्षतोडीची भयानकता अधिक आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश मधील जवळपास ३० ते ४० किलोमीटरची सीमा यात गुंतली आहे.
हेडलोड
मध्यप्रदेश जंगलासह मेळघाट वनविभागांतर्गत पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट सीमेलगत मोठी अवैध वृक्षतोड आहे. हे सर्व लाकूड हेडलोडने म्हणजेच डोक्यावरून सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी गावालगत गोळा केले जात आहे. मध्य प्रदेशातील लाकूड महाराष्टÑात गोळा करून वनतस्कर आंध्र प्रदेशात पाठवितात.