महाराष्ट्र हा मराठ्यांचा; आरक्षण मिळालेच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:22 PM2018-08-04T22:22:23+5:302018-08-04T22:23:18+5:30
महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे. त्यांना आरक्षण नाही, तर कोणाला देणार, असा सवाल करीत मारवाडी समाजाचे मोहन जाजोदिया यांनी वालकट कम्पाऊंडजवळील पेट्रोल पंपाजवळ एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले. येथे लागलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे. त्यांना आरक्षण नाही, तर कोणाला देणार, असा सवाल करीत मारवाडी समाजाचे मोहन जाजोदिया यांनी वालकट कम्पाऊंडजवळील पेट्रोल पंपाजवळ एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले. येथे लागलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले.
राजस्थान जर मारवाडींचा, गुजरात गुजरातींचा, बंगाल बंगालींचा, केरळ केरळींचा, हरियाणा जाटांचा, पंजाब पंजाबींचा, तर महाराष्ट्र हा मराठ्यांचाच आहे. त्या-त्या राज्यांमध्ये स्थानिकांना जर सुविधा, आरक्षण आहे, तर महाराष्ट्रात मराठ्यांना का नाही? यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी रेटून धरली असल्याचे जाजोदिया यांनी सांगितले.
राज्याची महती सांगताना ते म्हणाले, माझ्या आईचा अकोल्यात, तर माझा अमरावतीत जन्म झाला. लग्न, मुले येथेच झाली. आईचा मृत्यू येथेच झाला. माझाही मृत्यू येथेच होईल. आमच्या रक्तात महाराष्ट्राचा कण अन् कण आहे व याचा मला सार्थ अभिमानदेखील आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, मुंबईचा सिद्धिविनायक, मुंबादेवी, शिरडीचे साईबाबा, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, अंबादेवी आदी महाराष्ट्राची शान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपकार नाही, हक्क आहे
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे; उपकार नाही किंवा भीक नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. आम्ही येथे व्यापार करतो. त्यामुळे आमचाही यामध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे. यामध्ये कुठलाही जात, धर्म व राजकारणाचा हस्तक्षेप नाही, असे जाजोदिया यांनी फलकावर नमूद केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत छावा संघटनेचे शहर अध्यक्ष दिलीप मोरे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास काचोडे आदी सहभागी झाले.