महाराष्ट्र संघाने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:53 PM2018-01-14T22:53:08+5:302018-01-14T22:54:15+5:30
येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय शालेय डॉज बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मुलांच्या गटात दिल्ली, तर मुलींच्या गटात मध्यप्रदेशला धूळ चारली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय शालेय डॉज बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मुलांच्या गटात दिल्ली, तर मुलींच्या गटात मध्यप्रदेशला धूळ चारली.
मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाला २-० ( दोन पाट्या व १४-३ गुण) असे नमविले. अतिशय रंजक ठरलेल्या मुलींच्या गटातील सामन्यात महाराष्ट्राने विद्याभारती (मध्य प्रदेश) संघाला २-० ( १५-२) ने पराभूत करून महाराष्ट्र संघाने जेतेपद आपल्या पारड्यात पाडून घेतले. बुधवारी पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा डॉजबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ६३ व्या राष्ट्रीय शालेय मुले व मुलींच्या १७ वर्षांखालील डॉज बॉल स्पर्धा अमरावती येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. दोन्ही स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम ठेवल्याने मैदानावर उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण होते. या स्पर्धेत नऊ राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांचे संघ सहभागी झाले होते. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आनंद उईके, तर मुलींच्या संघाचे प्रशिक्षक धीरज तायडे होते.
स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वितरण झाले. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका कीर्ती गवई, प्राचार्य स्मिता देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा डॉज बॉल संघटनेचे अध्यक्ष वसंत लुंगे, पर्यवेक्षक शर्मा, सुगंध बंड, उदय ठाकरे, प्रल्हाद राऊत नितीन चवाळे, बबन आवारे, विश्वास जाधव, कैलास करवंदे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेता व इतर संघाला पदक, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रीडाप्रेमींची गर्दी झाली होती.