महाराष्ट्रातील वाघाचा मध्य प्रदेशात मृत्यू; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 08:33 PM2020-04-13T20:33:41+5:302020-04-13T20:34:42+5:30
अंबाबरवा वन अभयारण्यातील टी-२३ वाघाचा मध्य प्रदेशात मृत्यू
परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अंबाबरवा वन अभयारण्यातील टी-२३ हा वाघ मध्य प्रदेशातील जंगलात मृतावस्थेत आढळून आला. आठ ते नऊ वर्षाच्या या वाघाचा नैसर्गिक मृत्यू १० ते १५ दिवसांपूर्वी झाला असून, त्याचे संपूर्ण शरीर कुजलेल्या स्थितीत मिळाले आहे. मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर विभागांतर्गत खकनार रेंजमधील अंबाझोल बीट अंंतर्गत वनखंड क्रमांक ३६१ मध्ये या वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. हे घटनास्थळ अंबाबरवा अभयारण्याच्या सीमेपासून पचोरी गावालगत चार किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे.
मृत वाघाचे सर्व अवयव व कातडी घटनास्थळावर आढळून आल्याने मध्य प्रदेश टास्क फोर्स या प्रकरणाची चौकशी करणार आहे. घटनेची माहिती बुऱ्हाणपूर वनअधिकाऱ्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला दिली. दप्तरी असलेल्या माहितीवरून व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या वाघाची ओळख पटवून घेतली. मृत वाघ टी-२३ आहे. अंबाबरवा-वान अभयारण्यात २०१६-१७, २०१७-१८ २०१८-१९ मध्ये नोंद आढळून आली आहे. वाघाची ओळख पटल्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकारी घटनास्थळावर जाऊन आलेत. अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात वाघाला कोरोनाची लागण बघता, टी-२३ च्या मृत्यूची कारणमीमांसा करताना कोविड-१९ च्या अनुषंगानेही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रत्येक व्याघ्र प्रकल्पांतर्गत तेथील वाघांचा फोटो अल्बम कॅमेरा ट्रॅपमुळे उपलब्ध आहे. त्यांना नंबर देण्यात आले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत टी-१, टी-२ ते टी-५० असे वाघाला क्रमांक आहेत. वाघाच्या अंगावरील काळ्या पट्ट्यांवरून देशभर वाघांची स्वतंत्र ओळख निश्चित होते. एका वाघाच्या अंगावरील हे काळे पट्टे अन्य कुठल्याही वाघाशी जुळत नाहीत. - डॉ. जयंत वडतकर मानद वन्यजीव रक्षक, अमरावती