Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज मतदान ! कुणी रोख, दारू, प्रलोभन देत असेल तर डायल करा ११२
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:04 AM2024-11-20T11:04:50+5:302024-11-20T11:05:31+5:30
पोलिस आयुक्तांचे आवाहन : शहरात ४४ मतदान केंद्रे संवेदनशील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आज २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होत आहे. शहर आयुक्तालयातील एकूण २७७ इमारतींत ७९१ मतदान केंद्रे आहेत. पैकी ज्या इमारतीत पाच व पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत, अशी ४४ ठिकाणे पोलिस दप्तरी संवेदनशील असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सोमवारी दिली. यादरम्यान कुणीही रोख रक्कम, दारू वा अन्य प्रलोभन देत असल्यास पोलिसांशी डायल ११२ सह नजीकचे पोलिस ठाणे, ठाणे इन्चार्जला माहिती देण्याचे आवाहन सीपी रेड्डी यांनी केले. सोबतच कुणीही आदर्श आचारसंहितेचा भंग करू नये; अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबीदेखील त्यांनी दिली.
दरम्यान, शहर आयुक्तालयातील ७९१ ठिकाणी होणारे मतदानस्थळी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांसह पॅरामिलिटरी फोर्सला शहर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रनिहाय सूचना केल्या. कमांडिंग ऑफिसरला एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले असून मध्य प्रदेशवरून आलेल्या होमगार्डसह सीआरपीएफ व अन्य फोर्सला हिंदी भाषेतील सूचना पुस्तके देण्यात आली आहेत. दरम्यान, १८ नोव्हेंबरच्या सायंकाळपासून सेक्टर व ठाणेनिहाय पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली असून अतिरिक्त नाकाबंदीदेखील केली जाणार आहे कुठेही काहीही झाल्यास, बूथवर काही घडल्यास अवघ्या पाच मिनिटांत अतिरिक्त पोलिस यंत्रणा तेथे पोहोचेल, अशी ग्वाहीदेखील सीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. यावेळी पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर यादेखील उपस्थित होत्या.
८.९८ कोटींचा मुद्देमाल जप्त
गेल्या १५ ऑक्टोबर दुपारपासून आदर्श आचारसंहिता अमलात आली. १६ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या महिन्याभराच्या काळात शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तपासणीदरम्यान सुमारे ८.९८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात २ कोटी ८१ लाख रुपये रोख, सुमारे ५.६० कोटी रुपयांचे सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. नाकाबंदी गबंदी व कारवाईत १८ लाख रुपये किमतीची सुमारे ३० हजार लिटर दारू पकडण्यात आली, तर ७.५३ लाख रुपये किमतीचा ३८ किलो गांजादेखील जप्त करण्यात आला.
३७८ पैकी २९२ जणांनी केली शस्त्रे जमा
पोलिस आयुक्तालयाकडून ३७८ जणांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे. पैकी ३७२ परवानाधारकांकडे अग्निशस्त्रे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर त्यापैकी २९२ शस्त्रे जमा करवून घेण्यात आली आहेत, तर ८४ जणांना त्यातून सूट देण्यात आली आहे. त्यात बँक, व्यापारी, गार्ड, डॉक्टर्स व अन्य काहींचा समावेश आहे. त्यांचा निवडणुकीशी सुतराम संबंध नाही.
"विधानसभेची मतदानप्रक्रिया भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा. ड्रोन पेट्रोलिंगदेखील केली जात आहे."
- नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त