मेळघाटातील वाघांना सुरक्षा देणार महात्मा गांधी अभयारण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:14+5:302021-07-17T04:11:14+5:30
फोटो - १६एएमपीएच०२ देशात सर्वाधिक नॅशनल पार्क मध्यप्रदेशात अनिल कडू परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमध्ये ...
फोटो - १६एएमपीएच०२
देशात सर्वाधिक नॅशनल पार्क मध्यप्रदेशात
अनिल कडू
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमध्ये महात्मा गांधी व्याघ्र अभयारण्य अस्तित्वात येत आहे. या व्याघ्र अभयारण्यामुळे मेळघाटातील वाघांना सुरक्षा मिळणार आहे, तर मेळघाट ते मध्य प्रदेश असा असलेला वाघांचा भ्रमंती मार्ग अधिक मजबूत व सुरक्षित होणार आहे. वाघांच्या भ्रमंतीदरम्यान त्यांना होणारे अपघात व शिकार याला अटकाव होणार आहे.
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वाघ मध्य प्रदेशकडे, तर मध्य प्रदेशातील वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात भ्रमंती दरम्यान पोहोचल्याची उदाहरणे आहेत. यात मेळघाटातील वाघांना मध्यप्रदेश वनक्षेत्रात, तर मध्यप्रदेशातील वाघांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अपघातही घडले आहेत.
महात्मा गांधी व्याघ्र अभयारण्यचे क्षेत्र १५३.५८ वर्ग किलोमीटर म्हणजेच १५३५८ हेक्टर आहे. यात मध्य प्रदेशातील बोरदली आणि खकनार वनपरिक्षेत्र समाविष्ट आहे. जे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे.
प्राप्त माहितीनुसार, मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील एक वाघीण आपल्या शावकासह मध्य प्रदेशातील खालवा जंगल क्षेत्रात सन २००० मध्ये निदर्शनास आली होती. २०१९-२० मध्ये खकनार रेंज अंतर्गत दंतवाडा जंगल क्षेत्रात, मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील एका वाघाचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील वाघ मेळघाट व्याघ्र अभयारण्यात रायपूर वनपरिक्षेत्रात २० जानेवारीला मृतावस्थेत आढळला. या घटनांनी मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वाघ मध्यप्रदेशकडे, तर मध्य प्रदेशातील वाघ मेळघाट व्याघ्र अभयारण्याकडे भ्रमंती करतात, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक नॅशनल पार्क
देशात एकूण १०४ नॅशनल पार्क आहेत. यात सर्वाधिक नॅशनल पार्क मध्य प्रदेशात आहेत. मध्य प्रदेशात आज १० नॅशनल पार्क, सहा व्याघ्र अभयारण्य आणि २५ वन्यजीव अभयारण्य आहेत. यासोबतच मध्य प्रदेशात नव्याने १० व्याघ्र अभयारण्य प्रस्तावित आहेत. या नव्या अभयारण्यामुळे वाघांचे भ्रमण मार्ग अधिक मजबूत व सुरक्षित होणार आहेत.
ओंकारेश्वर वन्यप्राणी अभयारण्य
महात्मा गांधी व्याघ्र अभयारण्यासोबतच खंडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर वन्यप्राणी अभयारण्य अस्तित्वात येत आहे. नर्मदा नदीच्या आसपास या अभयारण्याचे क्षेत्र राहणार आहे. यातील अधिक क्षेत्र इंदिरा सागर आणि ओंकारेश्वर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात राहणार आहे. या अभयारण्याचे क्षेत्र ६१४.०७ वर्ग किलोमीटर आहे.