महात्मा फुलेंनी व्यवस्थेविरुद्ध लढण्यास माणसं उभी केली- सतेश्वर मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 08:26 PM2018-02-10T20:26:53+5:302018-02-10T20:26:59+5:30
महात्मा फुलेंनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात माणसं उभी करून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले, असे प्रतिपादन सतेश्वर मोरे यांनी केले.
अमरावती : महात्मा फुलेंनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात माणसं उभी करून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले, असे प्रतिपादन सतेश्वर मोरे यांनी केले. व-हाड विकास प्रकाशन संस्थेच्यावतीने दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे डॉ.सौ. कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयात नववे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन शनिवारी पार पडले. त्याच्या अध्यक्षस्थानाहून मोरे बोलत होते.
पत्रकार सचिन काटे यांनी महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी साखळीतून मुक्त करून संमेलनाचे आगळेवेगळे उद्घाटन केले. संमेलनाचे संयोजक श्रीकृष्ण बनसोड यांनी प्रास्ताविक केले. आयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पुढील सत्रात सत्यशोधक सुनयना अजात, पी.आर.एस. राव यांनी परिसंवादात अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. सत्तेश्वर मोरे यांनी म. फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाची अनिवार्यता व्यक्त करून म. फुलेंच्या विचाराचे आकलन, चिंतन व अनुकरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. ‘मी सावित्री बोलतेय’ ही बहारदार एकपात्री नाट्यकर्मी वैशाली धाकूलकर यांनी सादर केली.
व्यासपीठावर प्राचार्य मधुकर आमले, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती बळवंत वानखडे, संजय बेलोकार , सरपंच दिनेश शेवतकर, उद्योजक सागर खलोकार, प्राचार्य अशोक पैठणे, पी.एम. भामोदे, प्रा. संतोष यावले, अजीज पटेल, सुदाम भगत आदींची उपस्थिती होती. दे.सु. बसवंत यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तनवादी कविसंमेलनात नीलिमा भोजणे, विजय वडगावकर, भास्कर बसवनाथे, शिवमती बारस्कर, आर.एस. तायडे, बबन इंगोले, प्रीतम जोहनपुरे, अरुणा लांडे आदी कवींचे सादरीकरण झाले. निलकंठ बोरोडे यांनी संचालन केले.