अमरावती बाजार समितीत महाविकास आघाडीचा कब्जा, भाजप, शिंदे सेना, रवि राणा यांच्या शेतकरी पॅनलचा सुपडा साफ
By गणेश वासनिक | Published: April 29, 2023 04:59 PM2023-04-29T16:59:09+5:302023-04-29T17:00:50+5:30
विजयानंतर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने एकच जल्लोष केला.
अमरावती : नागपूरनंतर विदर्भातील सर्वात मोठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलने सर्व १८ जागांवर कब्जा करीत भाजप, शिंदे सेना आणि आमदार रवि राणा यांच्या शेतकरी पॅनलला चारी मुंड्या चित केले. झालेल्या दारुण पराभवामुळे ही मंडळी अस्वस्थ झाली असून रवि राणा यांचे थोरले बंधू सुनील राणा यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.
विजयानंतर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने एकच जल्लोष केला. स्वत: यशोमती ठाकूर यांनी रस्त्यावर येत आनंद साजरा केला. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले. हनुमान चालिसाचा गैरवापर करणाऱ्यांना खुद्द शेतकऱ्यांनीच धडा शिकवला. धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
तिकडे तिवसा, चांदूर रेल्वे, भातकुली,मोर्शी या बाजार समित्यांमध्येही महाविकास आघाडीला घवघवीत यश आले तर भाजपप्रणीत पॅनलला जोरदार धक्का बसला. मोर्शीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या गटाचा पराभव झाला असून येथे त्यांनी काँग्रेसच्या एका गटाशी युती केली होती मात्र मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले, हे विशेष.