वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण
By प्रदीप भाकरे | Published: May 23, 2023 01:58 PM2023-05-23T13:58:02+5:302023-05-23T13:58:34+5:30
एमआयडीसी परिसरातील वीज केंद्रावरील घटना
अमरावती : वीजपुरवठा खंडित का केला, अशी विचारणा करून महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. २२ मे रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास एमआयडीसीस्थित महावितरण कार्यालयात हा प्रकार घडला. याप्रकरणी जखमी कर्मचारी मंगेश काळे (३९, सामरानगर) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी राहुल राजू तिवारी (२१, एमआयडीसी क्वार्टर, अमरावती) याच्याविरूद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, मारहाण व शिविगाळ केल्याप्रकरणी २२ मे रोजी दुपारी गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, मंगेश काळे व वैभव सावळे हे दोघे कर्मचारी २२ मे रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास एमआयडीसी भागातील फ्लॅट क्रमांक ३०९ समोर गेले. तेथे त्यांनी डोअर बेल वाजविली असता एक मुलगी घराबाहेर आली. आपण मागील पाच महिन्यांपासून विजबिल भरले नसल्याने आम्ही तुमचा वीजपुरवठा खंडित करीत आहोत, असे त्या दोघांनी त्या मुलीला सांगितले. वीजपुरवठा खंडित करून ते दोघेही कार्यालयात परतले. तेथे एका मुलाचा मंगेश काळे यांना मोबाईल कॉल आला. तुने मेरे घरकी लाईन कैसे काटी, मै तुझे देख लेता, असा तो बरळला. मात्र काही वेळातच तो मुलगा महावितरणच्या एमआयडीसीस्थित कार्यालयात पोहोचला. तेथे त्याने मंगेश काळे यांची कॉलर पकडली. तथा नाकावर बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेनंतर काळे यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले.