मजीप्राच्या पाइपलाईनवर महावितरणचे केबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:28 PM2018-08-10T22:28:08+5:302018-08-10T22:28:29+5:30
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत शहरात टाकण्यात येणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीच्या अयोग्य कामाबाबत जनक्षोभ उसळला आहे. महावितरणने ज्या एजंसीला हे भूमिगत केबल वायर टाकण्याचे काम दिले, ती किशोर इन्फ्रा नामक एजंसी ते केबल मजीप्राच्या पाइपलाईनवर टाकत असल्याने विरोधाचा सूर तीव्र झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत शहरात टाकण्यात येणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीच्या अयोग्य कामाबाबत जनक्षोभ उसळला आहे. महावितरणने ज्या एजंसीला हे भूमिगत केबल वायर टाकण्याचे काम दिले, ती किशोर इन्फ्रा नामक एजंसी ते केबल मजीप्राच्या पाइपलाईनवर टाकत असल्याने विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. शुक्रवारी मुदलियारनगर येथील नागरिकांनी महावितरणचे हे भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम थांबविले. त्यावेळी त्या नागरिकांची एजंसीच्या साइट इंजिनीअरशी शाब्दिक चकमकही उडाली. मजीप्र्राने दिलेल्या पत्राला आपण मानत नसल्याचे त्याने नागरिकांना सांगितले. त्यामुळे संतापात भर पडली.
महावितरणकडून महापालिका क्षेत्रात सुमारे ३२० किलोमीटरची भूमिगत वीजवाहिनी टाकली जात आहे. त्यासाठी शहराच्या विविध भागात खोदकाम सुरब आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी सकाळी मुदलियारनगरातील हनुमान मंदिरालगत असलेल्या रस्त्याच्या बाजूने खोदकाम करण्यात आले तेव्हा पिण्याची पाइप लाइन उघडी पडली. त्यावर वीजवाहिनी टाकली जात असल्याची बाब स्थानिकांच्या लक्षात आली. त्यांनी ही बाब नगरसेवक प्रदीप हिवसे यांच्या कानावर घातली. ते दाखल झाले. त्यांनी महावितरणचे सहायक अभियंता देवतळे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, ते घटनास्थळी आले नाहीत. नागरिकांनी किशोर इन्फ्राचे साइट इंजिनीअर अमोल वाघमारे यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्याचवेळी मजीप्राचे सहायक अभियंता गुरुदत्त अविनाशे पाचारण करण्यात आले. पाणीपुरवठ्याच्या वाहिनीमध्ये नेहमी लिकेज येत राहतात. आम्हाला अनेकदा त्यासाठी नव्याने खोदकाम करावे लागते, अशा परिस्थितीत पाणीपुरवठ्याच्या लाइनवर महावितरणचे केबल असल्यास मोठा धोका असल्याची माहिती त्यांनी दिली. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना तसे पत्र दिल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली. मात्र, त्यानंतरही अमोल वाघमारे बधले नाहीत. नगरसेवक प्रदीप हिवसे व नागरिकांशी वाघमारे यांनी हुज्जत घातली. त्यानंतर पाण्याच्या पाइप लाइनवर महावितरणची भूमिगत केबल वायर टाकू न देण्याचा पवित्रा स्थानिकांनी घेतला. यापूर्वी किरणनगर भागातही या कंपनीच्या प्रतिनिधींनी नागरिकांशी हुज्जत घातली होती.
ज्या ठिकाणी मजीप्राची भूमिगत पाइपलाईन आहे, त्याच्यावर भूमिगत वीजवाहिनी टाकली जात आहे. खोदकामादरम्यान किंवा केव्हाही ती पाइप लाइन फुटल्यास स्थानिक नागरिकांना मोठा धोका संभवतो. महावितरणने या अनुचित प्रकाराची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल.
- प्रदीप हिवसे
नगरसेवक
आमच्या वसाहतीत शुक्रवारी महावितरणने खोदकाम सुरू केले. पाणीपुरवठ्याच्या पाइप लाइनवरच वीजवाहिनी टाकत असल्याचे समजले. याबाबत कंपनीच्या साइट इंजिनीअरने उडवाउडवीची उत्तरे दिली. पाइप लाइन फुटली आणि त्यावर अंथरलेल्या वाहिनीतून वीजप्रवाह संचारित झाला, तर ती जबाबदारी कुणाची?
- ए.डी.श्रीखंडे, ज्ञानेश्वर गाडबैल, मुदलियारनगर
महावितरणची केबल मजीप्राच्या पाइप लाइनशी समांतर टाकावी लागते. मुदलियारनगरमध्ये डाव्या बाजूने खोदकाम केले. त्यावर नागरिकांचा आक्षेप आहे. मात्र, उजव्या बाजूने काँक्रीटीकरण असल्याने खोदकाम शक्य नाही.
- डी.एस.देवतळे, सहायक अभियंता, महावितरण
कंपनीकडून आलेल्या निर्देशानुसारच मुदलियारनगरात खोदकाम करण्यात आले. महावितरणच्या केबलचा पाणीपुरवठा वाहिनीशी संबंध नाही. महावितरणच्या अधिकाºयांना वस्तुस्थिती ज्ञात आहे.
- अमोल वाघमारे, प्रतिनिधी किशोर इन्फ्रा, हैद्राबाद