महावितरणचा ‘शॉक’
By admin | Published: May 11, 2016 12:29 AM2016-05-11T00:29:58+5:302016-05-11T00:29:58+5:30
महावितरणने मे, जून व जुलै या तीन महिन्यांसाठी इंधन समायोजन आकार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वीज दरवाढ : तीन महिन्यांसाठी पुन्हा इंधन समायोजन आकार लागू
अमरावती : महावितरणने मे, जून व जुलै या तीन महिन्यांसाठी इंधन समायोजन आकार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ टक्के वीज दरवाढीमुळे दरमहा सुमारे ५०० कोटी रुपये ग्राहकांच्या खिशातून काढले जाणार आहेत. त्यामुळे हा वीज दरवाढीचा ‘शॉक’ सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडेल, यात दुमत नाहीे.
मे, जून व जुलै २०१६ मध्ये येणाऱ्या अनुक्रमे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या बिलांमध्ये दरमहा किमान ५०० कोटींहून अधिक इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला आहे. हा मागील दराने देण्यात आलेला ११ टक्के वीज दरवाढीचा ‘शॉक’ आहे. नोव्हेंबर २०१५ पासून तीन महिने दरमहा ५९१ कोटी रुपये इंधन समायोजन आकार लागू झाला होता. त्यानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापुढे इंधन समायोजन आकार लागू होणार नाही, तर काही ठिकाणी यापुढे इंधन समायोजन आकार अधिक लागणार नाही, असे जाहीर केले होते. तथापि या सर्व घोषणा फोल असल्याचे महावितरणने कृतीतून दाखवून दिल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केला आहे.
२६ जून २०१५ रोजी नवीन वीज दर निश्चिती करताना आयोगाने सरासरी ८.५ टक्के दरवाढीला मंजुरी दिली आहे. तथापि त्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये १३ टक्के, फेब्रुवारी २०१६ मध्ये ९ टक्के व आता मे २०१६ मध्ये ११ टक्के इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला आहे. सरासरी एकूण १९.५ टक्के वीज दरवाढ ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे. वाढत्या, अवाजवी व बेकायदेशीर इंधन समायोजन आकारणीमुळे राज्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. राज्यात औद्योगिक वीजदर आसपासच्या राज्यांपेक्षा २५ ते ३५ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत औद्योगिक वीज वापरातील वाढ शून्य आहे. अशावेळी १० टक्के वीजदराचा फटका उद्योगधंद्यांसाठी जाचक आहे. वीज दरवाढीमुळे औद्योगिक क्षेत्रावर कुऱ्हाड कोसळून त्याचे दुष्परिणाम नक्की जाणवतील, अशा प्रतिक्रिया सामान्य वीज ग्राहकांमधून उमटत आहेत. वारंवार या ना त्या निमित्ताने विजेची दरवाढ करून ग्राहकांना मन:स्ताप दिला जात आहे. यामुळे सामान्य वीज ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. छुप्या पध्दतीने होणारी ही वीज दरवाढ मागे घ्यावी, असा सूर देखील विद्युत ग्राहकांमधून उमटत आहे.
असे असेल इंधन समायोजन
आकार प्रति युनिट
उच्चदाब उद्योग एक्स्प्रेस फीडर ९८.८६ पैसे, नॉन एक्स्प्रेस फीडर ७३.१३ पैसे, लघुदाब उद्योग २७ हॉर्स पॉवरच्या आत ६२.७२ पैसे आणि २७ हॉर्स पॉवरवरील ६९.१४ पैसे, घरगुती ग्राहक १०० युनिटपर्यंत ३७.०८ पैसे, ३०० युनिटच्यावर ११९.०७ पैसे अशी वीज दर आकारणी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
असे असेल इंधन समायोजन
आकार प्रति युनिट
उच्चदाब उद्योग एक्स्प्रेस फीडर ९८.८६ पैसे, नॉन एक्स्प्रेस फीडर ७३.१३ पैसे, लघुदाब उद्योग २७ हॉर्स पॉवरच्या आत ६२.७२ पैसे आणि २७ हॉर्स पॉवरवरील ६९.१४ पैसे, घरगुती ग्राहक १०० युनिटपर्यंत ३७.०८ पैसे, ३०० युनिटच्यावर ११९.०७ पैसे अशी वीज दर आकारणी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
महावितरणचा ४ वर्षांसाठी
वीजदर वाढीचा प्रस्ताव
महावितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर सन २०१६ ते २०२० या चार वर्षांसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. प्रस्तावात दरवर्षी ५.५ टक्के व चक्रवाढ पद्धतीने चार वर्षांत २४ टक्के याप्रमाणे वीज दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार चार वर्षांत राज्यातील सव्वादोन कोटी वीजग्राहकांवर एकूण अतिरिक्त बोजा ३९००० कोटी रुपये लादण्यात आला आहे.
वीज दरवाढ शासन निर्णयानुसार केली जाते. एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी इंधन समायोजन आकार आकारणी करण्याचा शासन आदेश २६ एप्रिल रोजी प्राप्त झाला आहे. त्यानुसार आकारणी करण्यात येईल.
- आर. बी. माहुरे
कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी
वीज कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट्य स्पर्धा, कार्यक्षमता व त्याआधारे दरनियंत्रण करणे हे आहे. मात्र, बाजारात ३.२५ पैसे प्रति युनिट दराने वीज मिळत असताना महानिर्मिती कंपनी ४ ते ५ रुपये युनिट दराने खरेदी करीत आहे.
- प्रताप होगाडे
अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना
आधीच राज्यात वीजदर अधिक आहे. अशातच इंधन समायोजन आकार आकारणी होत असेल तर ते अन्यायकारक आहे. वीज दरवाढीच्या शासन निर्णयाचा कडाडून विरोध केला जाईल. याचा फटका शासनालाही नक्कीच बसेल.
- किरण पातुरकर
अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन