महेंद्री जंगल झाले संवर्धन राखीव क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:06+5:302021-09-27T04:14:06+5:30
फोटो - वरूड : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत ६ हजार ७८२ हेक्टर ५० आर मध्ये वसलेल्या महेंद्री जंगलाला संवर्धन राखीव ...
फोटो -
वरूड : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत ६ हजार ७८२ हेक्टर ५० आर मध्ये वसलेल्या महेंद्री जंगलाला संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर करणारा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. यामुळे वरूड तालुक्याच्या वैभवात भर पडणार असून पर्यटकांची गर्दी वाढेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यात वरुड तालुक्याचे नाव जाईल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील.
सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. या जंगलाला सातपुड्याचे संरक्षण लाभले आहे. वर्धा डायव्हर्शन, सुपर एक्सप्रेस कॅनाल, शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नदी याच पर्वतातून वाहत येते. भेंमडी, झटामझिरी, शेकदरी, नागठाणा १ आणि २, सातनूर, पुसली, वाई, पंढरी मध्यम प्रकल्प, पंढरी प्रकल्प असून वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरीण, रानडुक्कर यांसारखे प्राणी या जंगलात आहेत. पक्षी, फुलपाखरांच्या अनेक प्रजाती आहेत. वनौषधी परिसर, धनोडी येथे वनउद्यान आहे. १०८ वर्षांचे ऐतिहासिक विश्रामगृहसुद्धा आहे. यामुळे अनेक वर्षांपासून महेंद्री-पंढरी परिसर अभयारण्य शासनाने घोषित करावे, अशी मागणी वन्यजीव प्राणिप्रेमींकडून केल्या जात होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ८ ऑगस्ट २०२० च्या महाराष्ट्र वन्यजीव मंडळाची नागपूरसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन महेंद्री जंगलाला अभयारण्य करण्यास मंजुरी देऊन तसे प्रस्ताव वनविभागाने तातडीने सादर करण्याचे आदेश दिले होते. २६ सप्टेंबर २०२० ला शासनाच्या तात्त्विक मंजुरीनंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मेळघाट व्याघ्र प्रकल्प), मुख्य वनसंरक्षक (अमरावती वनवृत्त) महेंद्री पंढरी येथील विश्रामगृहावर येऊन जंगलाची माहिती आणि भौगोलिक क्षेत्राची माहिती घेतली होती. परंतु, राजकीय नेते आणि ग्रामस्थांचा विरोध पाहता महेंद्री अभयारण्याचे रूपांतर संरक्षित वनक्षेत्रात करून तसा वनविभागाला प्रस्ताव पाठविण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले होते. परंतु, दहा महिन्यापासून प्रस्ताव धूळ खात होते. अखेर १३ सप्टेंबरला महसूल व वन विभागाने अधिसूचना काढली.
------------
असे राहील संवर्धन राखीव क्षेत्र
वरूड परिक्षेत्रातील ६ हजार ७८२ हेक्टर ५० आर वनक्षेत्र संवर्धन राखीव घोषित झाले. यामध्ये शेकदरी, गव्हाणकुंड, भेंमडी, झटामझिरी, रवाळा, जामगाव, कारली, वाई, महेंद्री, पिपलागड, कारवार, लिंगा, एकालविहीर, तरोडी, उराड, पुसला, पंढरी, रामापूर, खापरखेडा, वाई खुर्द या गावांलगतच्या सीमावर्ती वनक्षेत्राचा समावेश आहे.
-------------
शासनाच्या अधिसूचनेमुळे वरूड तालुक्यातील वनक्षेत्राचे जतन होईल. यासाठी वनविभागाने सातत्याने पाठपुरावा केला आहे.
- चंद्रशेखरन बाला, उपवनसंरक्षक, अमरावती