झोन सभापतीपदांवर महिलाराज
By admin | Published: April 11, 2017 12:23 AM2017-04-11T00:23:06+5:302017-04-11T00:23:06+5:30
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी झालेल्या झोन सभापती अर्थात मिनी महापौर पदाच्या निवडणुकीत महिला नगरसेवकांनी मोहोर उमटविली.
भाजपकडे दोन मिनी महापौर : एमआयएम, सेना, बसपला संधी
अमरावती : महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी झालेल्या झोन सभापती अर्थात मिनी महापौर पदाच्या निवडणुकीत महिला नगरसेवकांनी मोहोर उमटविली. पाचही झोन सभापतीपदावर महिला नगरसेवकांची अविरोध निवड झाली. यात पहिल्या दोन झोनचे सभापतीपद भाजपकडे तर उर्वरित तीन सभापतीपद शिवसेना, बसपा आणि एमआयएमकडे गेले. आपसी समझोत्यानंतर नामांकन अर्ज परत घेतल्याने पाचही सभापती अविरोध निवडून आलेत.
झोन क्रमांक १ च्या सभापतीपदाची माळ भाजपच्या सुरेखा लुंगारे तर मध्य झोन यादुसऱ्या झोनचे सभापतीपद भाजपच्याच लविना हर्षे यांच्याकडे गेले.
झोन क्रमांक तीनच्या सभापतीपदावर बसपच्या माला देवकर यांची अविरोध निवड झाली. बडनेरा झोनचे सभापतीपद शिवसेनेने पटकावले. येथे भाजपचे चेतन गावंडे आणि एमआएमचे मो.साबीर यांनी नामांकन परत घेतल्याने शिवसेनच्या अर्चना बंडू धामणे या मिनी महापौर म्हणून अविरोध निवडल्या गेल्या. पाचव्या क्रमांकाच्या भाजीबाजार झोनची माळ एमआयएमच्या रजिया खातून यांच्या गळ्यात पडली. एकंदर सकारात्मक राजकारण झाल्याने काँग्रेस वगळता अन्य पक्षाचे नगरसेवक झोन सभापती ठरले.
पाचही झोन सभापती अविरोध
अमरावती : परस्पर तडजोड झाल्यानंतर सोमवारी ही निवडणूक अविरोध करण्याचे मत मांडण्यात आले. त्याला होकार देत सर्व गटनेत्यांनी ही निवडणूक अविरोध घडवून आणली. महापालिकेच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सोमवारी सकाळी पिठासिन अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.
पाचही झोन सभापतींची अविरोध निवड झाल्यानंतर महापौर संजय नरवणे यांच्यासह उपमहापौर संध्या टिकले, स्थायी सभापती तुषार भारतीय, पक्षनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, बसपचे गटनेते चेतन पवार यांच्यासह सेनेचे प्रशांत वानखडे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. महापौर आणि उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृहनेतेपद पटकावणाऱ्या भाजपपाठोपाठ झोन सभापती निवडणुकीत बसप, सेना आणि एमआयएमने चमत्कार घडविला.
महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात भाजपकडे स्वत:च्या ४५ सदस्यांसह युवा स्वाभिमानचे ३ व अन्य एका अपक्षासह ४९, काँग्रेसकडे १५, एमआयएमकडे १०, शिवसेनेकडे ७, बसपचे ५ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे. सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय हालचालींना अधिक वेग आला होता. झोन क्रमांक १ रामपुरी कँम्पमध्ये भाजपचे १७ व काँग्रेसचे ३ सदस्य आहेत तर झोन क्रमांक २ राजापेठमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. याझोनमध्ये एकूण १६ नगरसेवकांचा समावेश असेल. हमालपुरास्थित झोन क्रमांक ३ मध्ये भाजपकडे पाच, काँग्रेस व बसपकडे प्रत्येकी ४ तर शिवसेनेकडे २ असे एकूण १५ सदस्य आहेत. झोन क्रमांक चार बडनेरामध्ये भाजपचे ८, शिवसेनेचे ४, एमआयएम व बसपचा प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत तर झोन क्रमांक पाच भाजीबाजारमध्ये काँग्रेस व एमआयएमचे प्रत्येकी ७, भाजपकडे ६ सदस्य आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी झालेल्या अविरोध निवडणूक प्रक्रियेत भाजप पाठोपाठ एमआयएम, शिवसेना आणि बसपाने बाजी मारली.(प्रतिनिधी)