अमरावती जिल्ह्यातील महिमापुरात आहे तेराव्या शतकातील रहस्यमयी विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 07:00 AM2022-01-30T07:00:00+5:302022-01-30T07:00:08+5:30

Amravati News दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर. पाहताक्षणी प्रेमात पडावे अशी ही पुरातन धरोहर. ८०० वर्षांनंतरही त्या ऐतिहासिक विहिरीचे गूढ अनुत्तरित आहे.

Mahimapur in Amravati district has a mysterious 13th century well | अमरावती जिल्ह्यातील महिमापुरात आहे तेराव्या शतकातील रहस्यमयी विहीर

अमरावती जिल्ह्यातील महिमापुरात आहे तेराव्या शतकातील रहस्यमयी विहीर

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यटकांची पावले वळताहेत, संवर्धनाची गरज

प्रदीप भाकरे

अमरावतीः महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध गडकिल्ले, वास्तू आहेत. त्या पुरातन वास्तूंशी सातवाहनांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचे नाते आहे. ज्या वास्तूंचा इतिहासइतिहासकारांनी मांडला, त्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, अनेक पुरातन वास्तू प्रसिद्धीपासून वंचित राहिल्या. त्यापैकी एक म्हणजे दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर. पाहताक्षणी प्रेमात पडावे अशी ही पुरातन धरोहर. ८०० वर्षांनंतरही त्या ऐतिहासिक विहिरीचे गूढ अनुत्तरित आहे.

अमरावतीहून सुमारे ४० किमी अंतरावर आसेगाव पूर्णाहून दर्यापूर मार्गाने वळले की, एक टुमदार गाव दिसते. ते म्हणजे महिमापूर. विहीर कुठाय, अशी विचारणा करताच पुढील भव्य वास्तूकडे अंगुलीनिर्देश केला जातो अन् अवचितच तोंडातून उच्चार निघतो, वाह, क्या बात है! आपल्या जिल्ह्यातील या ऐतिहासिक पायविहिरीबाबत आपल्याला माहिती नव्हते? आपण कपाळकरंटे की काय, अशी काही क्षण आपली स्थिती होते. या विहिरीचे बांधकाम अंदाजे तेराव्या शतकातले आहे, असा फलक सुरुवातीला लक्ष वेधून घेतो. मात्र, विहिरीचा इतिहास कुणालाही माहिती नाही. तो गावात कुणीही सांगत नाही. विहिरीची निर्मिती आधी झाली, त्यानंतर गाव वसले असेल, अशी शक्यता केवळ व्यक्त केली जाते.

अशी आहे रचना

महिमापूरच्या या ऐतिहासिक विहिरीचा आकार चौकोनी आहे. सुमारे ८० फूट खोली. तर रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ पायऱ्या. त्या पायऱ्या आताशा खचू लागल्या आहेत. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी आहेत. प्रवेशद्वारावर दोन पुष्पे दगडात कोरलेली. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल, अशी व्यवस्था आहे. बांधकाम संपल्यानंतर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आता या विहिरीला पाणी नसल्याने अगदी तळाशीदेखील जाणे शक्य आहे.

स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली भव्य ऐतिहासिक सातमजली पायविहीर आजही दिमाखत उभी आहे. नागपूरच्या पुरातत्व विभागाच्या लेखी राज्य संरक्षित स्मारक म्हणून त्या विहिरीची नोंद असली तरी विहिरीच्या संवर्धनाकडे पार दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे विहिरींचे संवर्धन, देखभाल-दुरुस्ती कागदोपत्रीच आहे. पर्यटनक्षेत्र म्हणून कुणाचेही गावाकडे, विहिरीकडे लक्ष नाही. तेथे पुरातत्त्व विभागाच्या एका फलकाशिवाय विहिरीचा इतिहास सांगणारे साधे फलकही नाही.

कपारीचे गूढ उकलेना

महिमापूरच्या या विहिरीचे तळापर्यंतचे बांधकाम पाहता येते. अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार, पूर्वी या विहिरीवर दोन मजल्यांचे बांधकाम होते. तेराव्या, चौदाव्या शतकातील युद्धस्थिती पाहता, संरक्षणासाठी वऱ्हाडात अनेक वास्तू उभारल्या गेल्या. त्यातील ही एक वास्तू असावी, असा होरा आहे. त्याकाळी पाहणाऱ्याला ही विहीरच आहे. हे लक्षातच येणार नाही, अशी त्या बांधकामाची रचना होती. वरील दोन मजले आता कोसळल्याने विहिरीचे आतील बांधकाम थेट वरून पाहता येते. तब्बल ७०० ते ८०० वर्षांनंतर ते शाबूत आहे. विहिरीच्या आत आजदेखील कपारीसमान गूढ रचना आहे, त्या कपारी नेमक्या कशासाठी होत्या, ते अद्यापही अनुत्तरित आहे.

महिमापूरच्या विहिरीचे वैशिष्ट्य

स्थापत्यशैलीचा अजोड व अनोखा नमुना असलेली महिमापूरची ऐतिहासिक सातमजली पायविहीर मुघलकालीन आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ती बांधली असावी, असे म्हटले जाते. विहिरीत खजिना दडलेला आहे, अशा अनेक दंतकथादेखील प्रचलित आहेत. ही विहीर पाहताना राजवाडा पाहिल्याचा भास होतो. या विहिरीला १२ दरवाजे आहेत. विहिरीचे कोरीव काम एवढे अद्भुत आहे की, ते पाहून सारे थक्क होतात. विहिरीचा उद्देश वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे व निवारा हाच होता, असे सांगितले जाते.

 

Web Title: Mahimapur in Amravati district has a mysterious 13th century well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास