Bachchu Kadu: मै झुकेगा नहीं! पहिली वेळ होती, पण पुन्हा माफी नाही; बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 03:28 PM2022-11-01T15:28:27+5:302022-11-01T15:28:53+5:30
खोके आणि किराणा वाटपावरून गेल्या आठवड्यात आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात झालेला वाद काही अंशी शमला.
अमरावती-
खोके आणि किराणा वाटपावरून गेल्या आठवड्यात आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात झालेला वाद काही अंशी शमला. आज बच्चू कडू यांनी जशास तसे उत्तर देण्यासाठी आणि आपली पुढील भूमिका जाहीर करण्यासाठी अमरावतीच्या नेहरू मैदानावर मंगळवारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला. त्याकरिता राज्यभरातून प्रहारचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. या मेळाव्यात बच्चू कडूंनी रवी राणा यांना पहिलीच वेळ होती म्हणून माफ करतोय, पण यापुढे अशी आगळीक घडली तर पुन्हा माफी नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे.
रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडूंनी आपली भूमिका केली स्पष्ट, म्हणाले...
"रवी राणांनी झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्ती केली त्याचा मी आनंद व्यक्त करतोय. नाहीतर उगाच आम्हाला हातपाय हलवायला लागले असते. त्यांनी मोठेपणा घेतला आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. तुम्ही दोन पावलं मागे घेतली तर आम्ही चार पावलं मागे घेऊ. आम्हाला आमची एनर्जी अशा कामात वाया घालवायची नाही. त्यामुळे हा विषय आता संपला आहे आणि राज्यातील कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ सत्कारणी लागावा यासाठी आम्ही झटत राहू", असं बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू यांनी यावेळी प्रहार संघटनेनं आजवर गोरगरीब जनता, अपंग व्यक्ती, शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसंच बंडखोरीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. "आता पवारांनी २०१४ साली भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. गरीबाची पोरगी पळाली की ती पळाली, तर श्रीमंताची पोरगी पळाली तर लव्ह मॅरेज होतं अशातला हा प्रकार आहे. आज कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत ते मला सांगा. खरंतर बंडखोरच आज पहिल्या पंक्तीत आहेत. आज सोशल मीडिया सुद्धा पैशांनी चालतो. जो चलता है वही बिकता है. आता एकदा चूक झाली म्हणून ठिक आहे. पहिली वेळ आहे म्हणून माफ करतोय. पण प्रहारच्या वाटेत यापुढे कुणी येईल तर प्रहारचा वार कसा आहे ते आम्ही दाखवून देऊ. आम्ही गांधींना मानतो पण भगतसिंग देखील आमच्या डोक्यात आहे. यापुढे आमच्या वाट्याला गेल्यास माफ करणार नाही", असं बच्चू कडू म्हणाले.
भविष्यात प्रहारचे १० आमदार स्टेजवर असतील
बच्चू कडू यांनी प्रहार संघटना पुढील काळात राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. "प्रहारची ही तर सुरुवात आहे. आज स्टेजवर दोन जण आहेत. पण येत्या काळात स्टेजवर १० जण असतील. आम्ही म्हटलं तर सरकार बसलं पाहिजे. आम्ही म्हटलं तर सरकार उठलं पाहिजे. अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी सरकारकडून कामं करून घेऊ. प्रहारचं नातं हे जातीशी नाही. आपलं नातं दु:खीतांसोबत जोडलं गेलं पाहिजे", असं बच्चू कडू म्हणाले.