सैनिकी शाळेच्या संचालकावर विनयभंगाचा गुन्हा
By Admin | Published: March 25, 2017 12:11 AM2017-03-25T00:11:01+5:302017-03-25T00:11:01+5:30
येथील वंदे मातरम् करिअर अकादमीचे (सैनिक स्कूल) संचालक व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख योगेश (मुन्ना) इसोकार....
आरोपी फरार : नोक री न देण्याची धमकी
अंजनगाव सुर्जी : येथील वंदे मातरम् करिअर अकादमीचे (सैनिक स्कूल) संचालक व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख योगेश (मुन्ना) इसोकार यांच्यावर संस्थेतील विद्यार्थिनीने विनयभंगाचा आरोप केल्याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अटक होण्याच्या भीतीने योगेश इसोकर फरार झाला आहे.
दर्यापूर मार्गावर योगेश इसोकार यांची सैनिक प्रशिक्षणपूर्व अकदामी आहे. यात जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून पोलीस दलात नोकरी मिळविण्याच्या अपेक्षेने प्रशिक्षणासाठी येतात. इसोकार यांच्या संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी आलेली पीडित विद्यार्थिनी नक्षलग्रस्त भागातून आली होती. तिने पोलिसांत तक्रार दिली. योगेश इसोकार तिची छेडखानी करीत होते. याचा विरोध तिने केला असता सरकारी नोकरी लागू देणार नाही, अशी धमकी देत मी जसे सांगतो तसे वागावे लागेल, अशी धमकी देत होता. यामुळे या विद्यार्थिनीने सहा महिन्यांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम तीन महिन्यांतच सोडण्याचा निर्णय घेतला. याची माहिती तिने कुटुंबीयांना दिल्याने त्यांनी इसोकार याच्याविरुद्ध अंजनगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविला. (शहर प्रतिनिधी)
पेपरही करून देत होते मॅनेज
योेगेश इसोकार हे पूर्वी केंद्रिय पोलीस दलात नोकरीवर होते. सैनिक अधिकाऱ्यांसोबत त्यांचे चांगले संबध होते. नुकत्याच उघडकीस आलेल्या सैनिक भरती पेपर फुटीमध्ये वंदे मातरम अकादमीचे संचालक योगेश इसोकार यांचा संबध असल्याची चर्चा होती. ते आपल्या अकादामीत आलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी लावून देत होते असे वंदे मातरम अकादमीतील प्रशिक्षणार्थ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.
योगेश इसोकार विरुद्ध तक्रार आल्यावर आम्ही त्याच्या घरी व अकादमीसह अन्य ठिकाणी शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत, त्यांच्या शोधासाठी पोलिस पाठविण्यात आले आहे.
- सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक, अंजनगाव सुर्जी