मोलकरीन निघाली चोर, मदतनीसही जेरबंद; २.४३ लाखांचे दागिने जप्त
By प्रदीप भाकरे | Published: November 16, 2023 06:06 PM2023-11-16T18:06:37+5:302023-11-16T18:08:32+5:30
महिनाभरात उलगडा
अमरावती : येथील एका माजी नगरसेविकेच्या घरातून २.४३ लाख रुपये किमतीचे दागिने चोरणाऱ्या मोलकरीण महिलेला अटक करण्यात आली. ते दागिने विकण्यासाठी तिला सहाय्य करणारा आरोपी देखील गजाआड करण्यात गाडगेनगर पोलिसांना यश आले. १४ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी एका संशयित महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
संध्या विजय चापळकर (वय ४० वर्ष, रा. वडरपुरा) व अनिस अहमद गुलाम गिलानी (वय ४२ वर्ष, रा. मुस्तफा नगर, हैदरपुरा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. माजी नगरसेविका या आपल्या बहिणीसह कांतानगर येथील घरी असताना चोरीचा प्रकार उघड झाला होता. लुंगारे यांच्या पर्समधील सोन्याची अंगठी,चेन, ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली हिऱ्याची अंगठी व ४ हजार रुपये रोख रक्कम असा २.४३ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना गाडगेनगर पोलिसांनी लुंगारे यांच्या घरात घरकाम करणारी महिला संध्या चापळकर हिच्याबाबत माहिती संकलित केली. खात्री पटल्यानंतर तिला १४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. चोरी केलेले दागिने विक्री करण्यास मदत करणारा अनिस अहमद गुलाम गिलानी याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला २.४३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, हवालदार सुभाष पाटील, आस्तिक देशमुख, गजानन बरडे, सुशांत प्रधान, प्रशांत वानखडे, सागर धरमकर, जयसेन वानखडे, जाकिर खान यांनी केली.