भाडेकरूच निघाला माधवनगरातील दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:57+5:302021-06-25T04:10:57+5:30
अमरावती : घरात दोन वर्षे भाडेकरू म्हणून राहिलेल्या आरोपीने इतर तिघांना सोबत घेऊन राजापेठ ठाणे हद्दीतील माधवनगर येथे ...
अमरावती : घरात दोन वर्षे भाडेकरू म्हणून राहिलेल्या आरोपीने इतर तिघांना सोबत घेऊन राजापेठ ठाणे हद्दीतील माधवनगर येथे दरोडा टाकला. बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून, पतिपत्नीचे हातपाय बांधून त्यांनी घरातील तीन लाख ८६ हजार रुपयांचे सोने व पैसे पळविले. या प्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून दोघांना बुधवारी अटक केली. घरात दोन वर्षांपासून राहणाऱ्या भाडेकरूच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती तपास पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. आरोपी दोन वर्षांपासून मातणे परिवाराच्या घरात पाळत ठेवून होता. त्यानंतर त्याने त्या परिवाराची खडान्खडा माहिती घेऊन सदर गुन्हा पूर्णत्वास नेला.
मुख्य सूत्रधार आरोपी समीर शहा नजीर शहा (वय २६) याला अंबाळा, ता. मोर्शी येथून पथकाने ताब्यात घेतले; तर त्याचा साथीदार मोहम्मद आरिफ (३०, रा. गवळीपुरा) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
समीर हा फिर्यादी शुभांगी मातणे यांच्या घरी वरच्या मजल्यावर भाड्याने राहत होता. त्याला शुभांगी यांचे पती हे सुवर्णकार असल्याची माहिती होती. त्यामुळे त्याच्यासह इतर तिघाजणांनी दरोड्याचा प्लॅन रचला. ७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी दरोडा टाकण्याचे ठरविले. सायंकाळी घरात कोणीही नसताना समीर अन्य फरार असलेला आरोपींसह महिलेच्या घरात लपवून बसला; तर मोहम्मद आवेश व फरार असलेला दुसरा आरोपी घरावर पाळत ठेवून होता. मात्र महिला अचानक घरात आली. तिने आरोपीला बघताच आरडाओरड करून विरोध दर्शविल्याने त्यांनी महिलेचे हात बांधले. त्यानंतर शांत डोक्याने घरातील सर्व सोने व पैसे काढले. मात्र अचानक महिलेचे पती घरी येऊन त्यांनीही आरडाओरड केली. आता आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच दोघांनी महिलेवर व पतीवर चाकूचा वार करून, तसेच बंदुकीचा धाक दाखवून चारही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पळ काढत असताना एक दुचाकीचालक आडवा आल्याने त्यांनी दुचाकीचालकाला फिल्मी स्टाईल खाली पाडून त्यालाही बंदुकीचा धाक दाखविला व हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याचीच दुचाकी घेऊन आरोपी पसार झाले. संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली; मात्र आरोपी गवसले नाहीत. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात डीसीपी शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घटनेचा सात महिने तपास केला, पुरावे गोळा केले. समीरचा सुगावा घटनेनंतर दोन महिन्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला लागला होता; मात्र तपासाचा भाग म्हणून त्यांनी त्याचे नाव जाहीर केले नाही. दोघांना अटक केली असून, त्यांना राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बॉक्स
समीरविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे
समीर हा आधीच गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाने दिली आहे. त्याच्यावर नागपूर, चांदूर बाजार व नांदगाव पेठ येथे बॅग लिफ्टिंग प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. तो ओळख लपवून महिलेच्या घरी भाड्याने राहत होता. पोलिसांच्या तपासात दरोड्यातील समीरच मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली आहे
बॉक्स:
फरार आरोपीवरही गुन्हे दाखल
दरोडा प्रकरणातील एका फरार आरोपीवरसुद्धा काही पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत; तर अन्य एक आरोपी हा इतर राज्यातील असल्याने शोधपथक त्याचा शोध घेत आहे. फरार असलेल्या ३३ वर्षीय आरोपीने हवेत दोन बंदुकीच्या गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
कोट
घटनेनंतर जेव्हा तपासाची सूत्रे हलविली तेव्हा समीर हाच मुख्य आरोपी असल्याचे पाच महिन्यांपूर्वीच कळले होते. मात्र तोे हाती लागत नव्हता. त्यानंतर मात्र गोपनीय माहिती घेऊन दोघांना ताब्यात घेतले. आणखी दोघांना लवकरच अटक करू व त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करू.
आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती.