प्रतीक्षा मेहेत्रे हत्या प्रकरण : मी तडपलो, तिलाही तडपवायचे होते - राहुल भडची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 07:54 PM2017-11-25T19:54:59+5:302017-11-25T19:55:39+5:30
प्रतीक्षा माझ्यासोबत राहण्यास सतत नकार देत असल्याने मी हेलावलो, विमनस्क झालो, तडपलो, त्याच प्रेमासाठी तीही तडपावी, यासाठी तिला केवळ ‘जखम ’द्यायची होती, तिला मारण्याचा माझा उद्देश मुळीच नव्हता, अशी कबुली आरोपी राहुल भड याने राजापेठ पोलिसांना दिली.
अमरावती : पुरोहितांच्या साक्षीने आपण परस्परांच्या गळ्यात लग्नाची माळ घातली. १० ऑक्टोबर २०१३ रोजी अधिकृतरीत्या विवाहबद्ध झालोत, तरीही प्रतीक्षा ऐकायला तयार नव्हती, माझे तिच्यावर नि:सिम प्रेम होते. पण ती माझ्यासोबत राहण्यास सतत नकार देत असल्याने मी हेलावलो, विमनस्क झालो, तडपलो, त्याच प्रेमासाठी तीही तडपावी, यासाठी तिला केवळ ‘जखम ’द्यायची होती, तिला मारण्याचा माझा उद्देश मुळीच नव्हता, अशी कबुली आरोपी राहुल भड याने राजापेठ पोलिसांना दिली. प्रतीक्षा मेहेत्रे हत्या प्रकरणी आरोपी राहुलला न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
साई नगरलगतच्या वृंदावन कॉलनी परिसरात गुरुवारी (23 नोव्हेंबर) भरदुपारी प्रतीक्षावर राहुलने चाकूने वार केलेत. घटनेनंतर आरोपी राहुल त्याच्या दुचाकीने दारव्हा येथे गेला. तेथून त्याने मूर्तिजापूर गाठले. राजापेठ पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे त्याला गुरुवारी उशिरा रात्री मूर्तिजापुरातून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने विष घेतल्याचे सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालायात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनेत वापरलेला चाकू आणि दुचाकी जप्त करण्यासाठी राजापेठ पोलिसांचे एक पथक आरोपीला घेऊन शनिवारी मूर्तिजापूरला गेले.
पोलिसांनी त्याच्याकडून मोबाइल व तीन सीमकार्ड जप्त केले. घटनेपूर्वी आरोपीने प्रतीक्षाशी मोबाइलवरून संवाद साधला का, याची माहिती घेण्यासाठी कॉल डिटेल्स अहवाल मागविण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी राजापेठ पोलिसांनी आरोपीला घेऊन वृंदावन कॉलनीस्थित घटनास्थळ गाठले. आरोपीने घटनास्थळी प्रतीक्षाची हत्या नेमकी कशी केली, याचे कथन केले. दरम्यान, आत्महत्येसाठी राहुलने मूर्तिजापूरमधील ज्या दुकानातील कीटकनाशक खरेदी केले त्या दुकानमालकाचे बयान नोंदविले जाणार आहे.
प्रतीक्षाशी प्रेमविवाह
आपण प्रतीक्षाशी प्रेमविवाह केला होता. तिचे आपल्यावरही जीवापाड प्रेम होते. मात्र, तिची आई व मामाच्या भूलथापांना ती बळी पडली व तिने लग्नानंतरही नांदण्यास नकार दिल्याची माहिती आरोपी राहुल भडने दिली.
समाजमन हादरले
३० मार्च २००५ रोजी बारावीत शिकणा-या दीपाली कुळकर्णी (वनश्री कॉलनी,अमरावती) हिची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. ओळखीतील राजू वानखडे नामक आरोपीने तिला जिवंत जाळले होते. ६६ टक्के जळलेल्या अवस्थेत तिने मृत्यूशी झुंज दिली. मात्र, ती झुंज अपयशी ठरली. त्या घटनने संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते. तरुणी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. बारा वर्षांनंतर प्रतीक्षाचा असाच नाहक बळी गेल्याने पुन्हा एकदा दीपाली कुळकर्णीच्या हत्या प्रकरणाची कटू आठवण जागी झाली. प्रतीक्षाला मरणोपरांत न्याय मिळावा, यासाठी अमरावतीकर एकवटलेत.