मका उत्पादकांना ऑनलाईन मुदतवाढीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:32+5:302021-05-28T04:10:32+5:30
श्यामकांत पाण्डेय धारणी : आदिवासी विकास महामंडळाच्या ऑनलाईन खरेदीला मुदतवाढ न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा शेकडो ...
श्यामकांत पाण्डेय
धारणी : आदिवासी विकास महामंडळाच्या ऑनलाईन खरेदीला मुदतवाढ न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल मका घरीच पडून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुदतवाढ न मिळाल्यास कवडीमोल दराने खासगी व्यापाऱ्यांच्या घशात टाकण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे.
रबी हंगामात मका पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत ३० एप्रिल होती. मात्र, ती कळविण्यात न आल्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाइन नोंदणीपासून वंचित राहिले. काही शेतकऱ्यांनी तर खरीप हंगामाच्या मशागती डोक्यावर आल्यामुळे हजार ते बाराशे रुपये क्विंटलप्रमाणे मका खासगी व्यापाऱ्यांना विकल्याची माहिती आहे. जेव्हा की आदिवासी विकास महामंडळात १८५० रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहे. त्यामुळे सरसकट ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल नुकसानीला आदिवासी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.
कोट
हंगामात मका पेरला होता. मात्र, मका खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे आणि ऑनलाईन नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे मी माझा मका खासगी व्यापाऱ्यांना विकण्यास बाध्य झालो.
- ताराचंद कासदेकर, शेतकरी, दुनी