‘मजीप्रा’ची संथगती नागरिकांच्या मुळावर!
By admin | Published: April 17, 2017 12:08 AM2017-04-17T00:08:02+5:302017-04-17T00:08:02+5:30
भुयारी गटार योजना रखडविलेल्या मजीप्राचा करंटेपणा अमरावतीकरांच्या मुळावर उठला आहे.
मूलभूत सुविधांमधील रस्त्यांचे बांधकाम : इंगोलेंचे प्रशासनाला निवेदन
अमरावती : भुयारी गटार योजना रखडविलेल्या मजीप्राचा करंटेपणा अमरावतीकरांच्या मुळावर उठला आहे. शहराच्या हृदयस्थानी राजकमल चौकात ‘मजीप्रा’कडून कार्यान्वित होणाऱ्या भुयारी गटाराच्या कामाच्या संथगतीने हा परिसर अपघातग्रस्त बनला आहे. त्या अनुषंगाने मूलभूत सुविधेच्या शासन निधीतून सुरू असलेल्या राजकमल चौक ते अंबागेट रस्ता निर्मितीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी माजी महापौर विलास इंगोले यांनी प्रशासनाकडे केली आहे. या अन्वये आयुक्तांनी कंत्राटदारासह मजीप्राच्या संबंधित अधिकाऱ्याची कानउघाडणी करत ‘चेंबर’ उभारणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
मूलभूत सुविधा सन २०१५-१६ अंतर्गत ३.२५ कोटी रुपये खर्च करून राजकमल ते अंबागेट काँक्रीट रस्ता व नाली तसेच बाजूला फुटपाथ तयार करण्याचे काम तूर्तास सुरू आहे. यात खडीकरण, डांबरीकरण, नाली, विद्युतीकरण व फुटपाथ बांधकामाचा समावेश आहे. संबंधित कंत्राटदाराला याबाबत १८ आॅक्टोबर २०१६ ला वर्कआॅर्डर देण्यात आली. मात्र त्यानंतर हे काम आचारसंहितेत अडकले. काम नव्याने सुरू झाल्यानंतर ५४० मीटरचा हा रस्ता भुयारी गटार योजनेच्या दुष्टचक्रात अडकला. आता मजीप्राने राजकमल चौकातील रस्त्याच्या मोठ्या भागावर चेंबरसाठी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र रस्ते निर्मिती आधीचे हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने हा परिसर अपघातग्रस्त झाला आहे. वाहने काढण्यासाठी या भागात केवळ एक चिंचोळी जागा असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात नुकताच एका शाळकरी विद्यार्थ्याचा अपघात घडल्याची बाब विलास इंगोले यांनी प्रशासनाच्या दृष्टीस आणून दिली आहे. या रस्त्याकरिता भुयारी गटार योजनेचा अडथळा निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
सुविधेसाठी की अपघातासाठी
अमरावतीकर नागरिकांच्या तसेच अंबादेवी भक्तगणाच्या सोयीसुविधेच्या दृष्टीने या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती विलास इंगोले यांनी आयुक्तांकडे केली आहे, तथा या रस्त्याचे बांधकाम अमरावतीकरांच्या मुळावर उठून देण्याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सूचनाही केली आहे.