सात कोटींचे वाटप तात्काळ करा
By admin | Published: May 7, 2017 12:10 AM2017-05-07T00:10:52+5:302017-05-07T00:10:52+5:30
खरीप २०१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना जाहीर पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात जाहीर झालेली ....
यशोमती ठाकूर आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खरीप २०१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना जाहीर पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात जाहीर झालेली मदत चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. याविषयी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत आ. यशोमती ठाकूर संतप्त झाल्यात. तत्काळ निधी जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
तिवसा तालुक्यातील १७ हजार शेतकऱ्यांचे सात कोटींचे अर्थसहाय्य हे गेल्या दोन महिन्यांपासून अमरावतीच्या अॅक्सीस बँक येथे पडून आहे. प्रशासनाच्या व बँकाच्या दिरंगाईमुळे हा निधी वाटपापासून पडून आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना दोन महिन्यापासून त्यांना निधी मिळाला नाही. त्यामुळे हा निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा अन्यथा आंदोलन करू असे आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क करून तत्काळ सात कोटी उपलब्ध करण्याचे आदेश दिले. तिवसा नगरपंचायतचे उपाध्यक्ष वैभव वानखडे, संदीप आमले, सागर राऊत, आशीष ताथोडे, मंगेश भगोले आदी उपस्थित होते.