शिक्षकांच्या कुटुंबीयांना कोरोना लस उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:25+5:302021-05-23T04:12:25+5:30
अमरावती : जिल्ह्यातील काही अपवाद वगळता बहुतांश शिक्षकांना लसीचा पहिला डोस न देताच कर्तव्यावर नियुक्त केलेले आहे. ...
अमरावती : जिल्ह्यातील काही अपवाद वगळता बहुतांश शिक्षकांना लसीचा पहिला डोस न देताच कर्तव्यावर नियुक्त केलेले आहे. दुसऱ्या डोसबद्दल विचारही केला जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लस देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या शिक्षकांना वेळोवेळी मागणी करूनही लस देण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. काही तांत्रिक मुद्दे पुढे करून लस देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे. फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, असे शासनाचे आदेश आहेत. परंतु, लसीकरण करणे तर दूर, एखादा शिक्षक कोरोनाबाधित झाल्यास त्यांच्या सोबतच्या शिक्षकांनाही ड्यूटीवर बोलावले जात असल्याचा आरोप शिक्षक समितीने केला आहे. गाव, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सर्व आरोग्य केंद्र आणि कुटुंब सर्वेक्षणाला नेमलेले तसेच कोविड सेंटरवर, चेक पोस्ट, लसीकरण केंद्र,तहसील कर्मचारी यांच्या सोबतीला पोलीस कार्यरत आहेत. त्या शिक्षक कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही कोरोना लस देण्यात यावी, जिल्ह्यातील १६ शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना विमा व सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी शिक्षक समितीने जिल्हाधिकारी, सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, जिल्हा कार्याध्यक्ष मनीष काळे, राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर, प्रमोद ठाकरे आदींनी केली आहे.