जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Published: March 10, 2016 12:28 AM2016-03-10T00:28:09+5:302016-03-10T00:28:09+5:30
शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे.
यशोमती ठाकूर : मतदारसंघात विकासकामे सुरु
तिवसा : शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे. परंतु अद्याप जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाने केलेल्या घोषणा व त्यांची अंमलबजावणी यामध्ये कोणताही ताळमेळ नाही. घोषणांच्या अतिवृष्टीत सरकारही वाहून गेल्याची टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली. त्या कठोरा गांधी येथील जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी मार्गाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर विनोद डांगे, जि.प. सदस्य, बाळासाहेब देशमुख, हरीश मोरे, वीरेंद्र जाधव, गजानन जवंजाळ उपस्थित होते. यावेळी यशोमती ठाकूर यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत कठोरा गांधी या गावाची निवड केल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत येथे शैक्षणिक व इतर सुविधा निर्माण करण्यात येतील, असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, सध्या जे सत्तेत आहेत त्यांनी केवळ धर्माच्या नावावर राजकारण सुरू केले आहे. धर्माबाबत ‘हम करे सो कायदा’ अशी नीती त्यांनी अवलंबली आहे. मात्र, घटनेने सर्वांना समसमान अधिकार बहाल केले असून कोणी कोणत्या धर्माची आराधना करावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. याबाबत कोणीही बळजबरी करू शकत नाही.
शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जैसे थे असताना सत्तेत असलेल्या पक्षाचे नेते मात्र जात, धर्माला महत्त्व देत आहेत. त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थ, मान्यवरांची उपस्थिती होती. आपणच आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे, असा सल्ला यावेळी आ. यशोमतींनी दिला. (प्रतिनिधी)