२१ दिवसांत खतनिर्मिती करा अन् १ लक्ष रुपयांचे बक्षीस घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 11:04 PM2018-11-05T23:04:54+5:302018-11-05T23:05:34+5:30
बायोकल्चर फवारणीतून सुकळी कम्पोस्ट यार्डमधील सुमारे आठ लाख टन कचऱ्याचे खत २१ दिवसांत निर्माण करून दाखवा आणि एक लक्ष रुपयांचे पारितोषिक आमच्याकडून घ्या, असे आव्हान पर्यावरण तज्ज्ञ नंदकिशोर गांधी, किशोर देशमुख आणि प्रकाश लढ्ढा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बायोकल्चर फवारणीतून सुकळी कम्पोस्ट यार्डमधील सुमारे आठ लाख टन कचऱ्याचे खत २१ दिवसांत निर्माण करून दाखवा आणि एक लक्ष रुपयांचे पारितोषिक आमच्याकडून घ्या, असे आव्हान पर्यावरण तज्ज्ञ नंदकिशोर गांधी, किशोर देशमुख आणि प्रकाश लढ्ढा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिले आहे.
अमरावती शहराच्या सुकळी कम्पोस्ट डेपोतील कचऱ्यावर बायोकल्चर (जैवसंवर्धन) द्रावणाची फवारणी करून २१ दिवसांत खतनिर्मिती करून समस्येवर उपाय योजण्याची माहिती महापालिकेने जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर गांधी आणि देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना हे आव्हान दिले आहे.
अमरावतीच्या कचराभूमीत सुमारे आठ लक्ष टन कचरा एकत्रित झाला आहे. आग लागल्यामुळे हा कचरा १५ दिवसांपासून धगधगत आहे. या कचऱ्यापासून सातत्याने अत्यंत घातक वायूचे उत्सर्जन होत आहे. सुमारे दहा चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या वातावरणात हा वायू आच्छादला गेला आहे. या वायू उत्सर्जनामुळे कचराभूमीजवळील लोकांनी इतरत्र स्थलांतर सुरू केले आहे.
सातत्याने जळण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे कचऱ्यातील खतनिर्मितीयोग्यतेचे घटक नष्ट झाले आहेत. आता शिल्लक असलेला कचरा अर्थात राख आहे. जो कचरा जळला नसेलही, तो विघटन होऊ न शकणारा आहे. अशा कचऱ्याचे खत होणे कदापिही शक्य नाही. महापालिकेने केलेला दावा हा सामान्य करदात्यांच्या डोळ्यांत केलेली धूळफेक आहे. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा, असे सांगणारी महापालिका स्वत: मात्र दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र करते. कचराभूमीत ते चित्र आम्ही अनेकदा बघितले आहे. पर्यावरण चळवळीचे दिल्लीतील कार्यकर्तेही या कचराभूमीला भेट देऊन गेले. त्यांनीही तेथील अव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. यूट्यूबवर त्यासंबंधी रिपोर्ट दिल्लीतील मंडळींनी अपलोड केला आहे.
२०० लिटरचे गणित अनाकलनिय
कचऱ्यावर २०० लिटर बायोकल्चर फवारणार असल्याचे आणि त्यातून खतनिर्मिती करणार असल्याचे महापालिकेने प्रसिद्धी माध्यमांतून जाहीर केले आहे. आठ लक्ष टन कचºयासाठी इतकेसे बायोकल्वर अर्थात ‘उंट के मुंह मे जिरा’ अशी स्थिती आहे. सर्वच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लक्षावधी लिटर बायोकल्चरची आवश्यकता असेल. त्यासाठी महापालिकेने निरीसारख्या संस्थेला पाचारण करावयास हवे. निविदा काढूनच योग्य संस्थेला कंत्राट द्यावयास हवे, असे मत गांधी आणि देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
कचरा निर्मूलनाचे कुठलेही उपाय योजलेले नाहीत. महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. अशाच कारणांसाठी वाशी आणि इतर महापालिकांच्या आयुक्तांना शिक्षा ठोठावली गेली आहे. आम्हीदेखील केंद्रीय हरित लवादात खटला भरणार आहोत.
- नंदकिशोर गांधी, प्लास्टिकबंदी अधिनियम तथा पर्यावरण तज्ज्ञ
कचरा सतत धुमसत असताना महापालिकेने काहीच करू नये, हा गुन्हाच आहे. सुकळी परिसरातील लोक स्थलांतरित होत आहेत. कचरा निर्मूलनाचे नियम अत्यंत कठोर आहेत. महापालिका आयुक्तांना नागरिकांनी निवेदन देऊनही त्यांची निष्क्रियता आश्चर्यकारक आहे.
- किशोर देशमुख,
भूवैज्ञानिक तथा पर्यावरण तज्ज्ञ