झुंजीत नर बिबट ठार, मेंदूत अंतर्गत अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू; दिला भडाग्नी
By गणेश वासनिक | Published: December 17, 2023 10:09 PM2023-12-17T22:09:26+5:302023-12-17T22:10:04+5:30
पशू वैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीत मृत बिबट्याचे विच्छेदन
गणेश वासनिक, अमरावती: दोन बिबट्यांमध्ये झालेला संघर्ष आणि झुंजीनंतर एक नर बिबट ठार झाल्याची घटना विद्यापीठाच्या मागील बाजूस राजुरा नाका पेट्रोल पंपसमोरील उत्तर वडाळी नियतक्षेत्र वनखंड क्रमांक ७ येथे रविवारी सकाळी १०.३० वाजता सुमारास निर्दशनास आली.
मृत बिबट्याचा वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून विच्छेदनासाठी वडाळी येथील वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्रात नेण्यात आल्याची माहिती वनविभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. वनकर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांना बिबट ठार झाल्याची माहिती दिली. त्यानंतर वडाळीच्या आरएफओ वर्षा हरणे यांच्यासह चमूने घटनास्थळ गाठले असता मृत बिबट हा नर असून, ५० फूट अंतरावर रक्तस्त्राव दिसून आला. बिबट्याच्या डोक्यावर नखाचे ओरखडे, तर जीभ दातांमध्ये दबली होती. पंजे आणि चेहऱ्यावर नखांच्या ओरखडल्याच्या खुणा आढळून आल्या. तसेच तोंडातून रक्त येत असल्यामुळे हा बिबट झुंजीत ठार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. त्याअनुषंगाने बिबट्याच्या मृत्युप्रकरणी वनविभागाने वनगुन्हा क्रमांक ०००६१/०१५०२ अन्वये १७ डिसेंबर २०२३ नुसार जारी केला आहे.
/////////////////////
वडाळी वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्रात विच्छेदन
मृत बिबट्याला वडाळी वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्रात विच्छेदनासाठी आणले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. जे. मोहोड, पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर ठोसर यांनी मृत बिबट्याची पाहणी करून प्राथमिक तपासणी केली. त्याच्या शरीरावर असलेल्या खुणा, ओरखडे आदींची नोंद पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. मानद वन्यजीव रक्षक सावन देशमुख, वडाळीच्या आरएफओ वर्षा हरणे, वनपाल, वनरक्षक यांच्यासह दोन पंचासमक्ष पशु शल्यचिकित्सकांनी विच्छेदन केले. बिबट्याच्या डोक्यावरील आतील भागात जखम झाल्याने मेंदूत अंतर्गत अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.
त्यानंतर बांबू गार्डन परिसरातील नियोजितस्थळी नियमानुसार मृत बिबट्याला भडाग्नी देण्यात आला.
/////////////////
पशु शल्यचिकित्सकांच्या प्राथमिक अहवालानुसार मृत बिबट्याच्या मेंदूत अंतर्गत अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. दोन बिबट्यात संघर्ष होऊन झुंज झाली असावी, असा अंदाज आहे. विद्यापीठाच्या मागील बाजूकडील जंगलात बिबट्यांची संख्या बऱ्यापैकी आहे.
- ज्योती पवार, एसीएफ, अमरावती