अस्वच्छतेने शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:57 PM2018-08-12T22:57:18+5:302018-08-12T22:57:44+5:30
शहरातील अस्वच्छतेने ‘स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावती’ला हरताळ फासला असताना शाळांच्या परिसरात कमालिची अस्वच्छता असल्याचे वास्तव अधोरेखित झाले आहे. शाळांच्या आजुबाजुला केरकचऱ्याचे ढिग साचल्याने चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजापेठ स्थित भारतीय विद्यालयासह शहरातील अनेक शाळा-विद्यालयांचे परिसर अस्वच्छतेच्या जंजाळात अडकले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील अस्वच्छतेने ‘स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावती’ला हरताळ फासला असताना शाळांच्या परिसरात कमालिची अस्वच्छता असल्याचे वास्तव अधोरेखित झाले आहे. शाळांच्या आजुबाजुला केरकचऱ्याचे ढिग साचल्याने चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजापेठ स्थित भारतीय विद्यालयासह शहरातील अनेक शाळा-विद्यालयांचे परिसर अस्वच्छतेच्या जंजाळात अडकले आहेत.
गतवर्षी महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छतेचे धडे दिले. मात्र ते धडे महापालिका आणि शेजारच्या नागरिकांवर परिमाणकारक ठरु शकले नसल्याची वस्तुस्थिती शाळा परिसरात साचलेल्या घाणीच्या साम्राज्यावरुन स्पष्ट झाली आहे.. राजापेठ परिसरातील काही शाळांमध्ये जाऊन 'लोकमत'ने स्वच्छताविषयक आढावा घेतला असता, शाळांच्या बाहेरच्या आवारात प्रचंड अस्वच्छता असल्याचे आढळले. त्यापैकी राजापेठ पोलीस ठाण्यालगत भारतीय विद्यालयाच्या आवाराबाहेर घनकचºयासह वैद्यकीय घनकचरा टाकला जात असल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली. या भागातील अनेक नागरिक आणि रुग्णालयाचा कचरा शाळेलगत असलेल्या खुल्या भागासह नालीशेजारी टाकण्यात येत असल्याने या विद्यालयातील ४०० विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खुल्या जागेतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष
शहरातील अनेक शाळांच्या आजूबाजूला खुले भूखंड किंवा मैदाने आहेत. काही ठिकाणी पाणी साचलेले आहे. गवत, झाडेझुडुपी वाढलेली आहेत. त्याची स्वच्छता होत नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व किटकांचे प्रमाण वाढले असून, त्याचाच परिणाम चिमुकल्या शाळकरी मुलांच्या आरोग्यावर होत आहे. बडनेरा रोड व दसरा मैदान मार्गावरील बेलपुरा, कृष्णार्पण कॉलनी अशा काही शाळेच्या आजुबाजुच्या परिसरात अस्वच्छता आढळून आली.
आम्ही शाळेचा आवार स्वच्छ ठेवतो, मात्र, आवाराबाहेरील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी केल्यात, मात्र, कुणीही दखल घेत नाही.
- अर्चना सांगळे (शेरेकर), सहायक शिक्षक
शेजारच्या रुग्णालयातील कचरा आमच्या विद्यालयालगत टाकला जातो. आम्ही मुलांना स्वच्छतेविषयक काळजी घेण्याचे सांगतो, मात्र, शाळेबाहेरील अस्वच्छता पाहून खंतही वाटते.
एस.डब्ल्यू. तापरे,
सहायक शिक्षक
महापालिका क्षेत्रातील शाळा, विद्यालयाबाहेरील परिसर स्वच्छतेची जबाबदारी कंत्राटदारांकडे आहे. नव्या कंत्राटात शाळा महाविद्यालय व खुल्या भूखंडांच्या स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला आहे.
- अजय जाधव,
वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता