‘मालू है कि मानते नहीं!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:04 PM2018-01-29T23:04:49+5:302018-01-29T23:05:21+5:30

आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेली नोटीस अव्हेरून मालू इन्फ्रास्पेसने बेकायदेशीर युनिपोलवर ‘स्व’जाहिराती झळकवल्या आहेत.

'Malu that does not believe!' | ‘मालू है कि मानते नहीं!’

‘मालू है कि मानते नहीं!’

Next
ठळक मुद्देआयुक्तांना ठेंगा : बेकायदेशीर युनिपोलवर जाहिराती

आॅनलाईन लोकमत
अमरावती : आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेली नोटीस अव्हेरून मालू इन्फ्रास्पेसने बेकायदेशीर युनिपोलवर ‘स्व’जाहिराती झळकवल्या आहेत. मालू इन्फ्रास्पेसच्या या उद्दामपणावर प्रशासनाने मौन धारण केले आहे. ‘मालू है कि मानता नहीं’ अशी हतबलतेची प्रतिक्रिया महापालिका प्रशासनाने दिली आहे.
हेमंत पवार यांच्याशी झालेल्या बेकायदेशीर करारनाम्याचा हवाला देत मालू इन्फ्रास्पेसने गर्ल्स हायस्कूल ते इर्विन रस्त्याच्या दुभाजकावर पाच युनिपोल उभारलेत. पवारांनी हा दुभाजक १० वर्षांसाठी मालूंना ‘गिफ्ट’ दिला आहे. ‘गर्ल्स हायस्कूल ते इर्विन दुभाजक विकले’ या वृत्तातून ‘लोकमत’ने त्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर अनधिकृत युनिपोल हटवावेत, अन्यथा आम्ही हटवू, अशी नोटीस ११ डिसेंबर रोजी महापालिकेने दिली.

न्यायालयाची अवहेलना
मालू इन्फ्रास्पेसला तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. तथापि, चुकीच्या जागेवर उभारलेले जाहिरातीसाठीचे युनिपोल न हटविता, मालू इन्फ्रास्पेसने थेट आयुक्तांवर शरसंधान केले. नोटीस मागे घ्या, अन्यथा १ सप्टेंबर २०१६ रोजीच्या करारनाम्याच्या उल्लंघनाचे दोषी म्हणून आपण पात्र व जबाबदार राहाल, असे उलटपक्षी कळविण्यात आले.
‘लोकमत’च्या सततच्या पाठपुराव्याने आयुक्तांनी मालू इन्फ्रास्पेसशी करण्यात आलेला करारनामा अनधिकृत ठरविला. कळस म्हणजे, २६ जानेवारीपासून त्या पाचही युनिपोलवर स्वत:च्या मालकीच्या मार्केटमध्ये असलेल्या प्रतिष्ठानांची जाहिरात फलके मालू इन्फ्रास्पेसने लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची राजरोस अवहेलना होत असताना मालूंसमोर महापालिकेने कच खाल्ली आहे.
प्रशासन ताटाखालचे मांजर
महापालिका मालू इन्फ्रास्पेसच्या ताटाखालचे मांजर आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत प्रशासनाने या प्रकरणात ‘कचखाऊ’ वृत्तीचे दर्शन घडविले आहे. यात थेट आयुक्तांचा संबंध असल्याने कनिष्ठ अधिकाºयांनी, कर्मचाºयांनी बोलावे तरी काय, अशी उलटपक्षी विचारणा होत आहे.
किती हा उद्दामपणा!
आपण ही नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत अनधिकृत जाहिरात पोल हटवावेत, अशी नोटीस ११ डिसेंबरला देण्यात आली होती. पोचमार्गाच्या विरामरेषेपासून २५ मीटर अंतरामध्ये रस्त्याच्या बाजूने कोणतीही जाहिरात लावण्यास परवानगी देता येत नाही, असे बजावण्यात आले होते. त्या नोटीसच्या प्रत्युत्तरात नोटीस पाठवत आणि आता चक्क त्या बेकायदेशीर युनिपोलवर जाहिराती लावून मालू इन्फ्रास्पेसने उद्दामपणा प्रदर्शित केला आहे.

Web Title: 'Malu that does not believe!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.