किस्सा नही... कहानी बन गई! आभासी जगाने घेतला दोघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 12:22 PM2022-03-15T12:22:19+5:302022-03-15T12:32:08+5:30
हर्षा तिच्या बहिणीसह फोटेसेशन करत असताना पाय घसरून ती शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली. तिला वाचविण्यासाठी बाजीलालनेही तळ्यात उडी घेतली मात्र त्यात त्याला यश आले नाही व दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
पथ्रोट (अमरावती) : ‘सब्र कर मेरी जान... किस्सा नही... अपनी कहानी होगी!’ हे शेवटचे वाक्य समाजमाध्यमावर आपला व्हिडीओ अपलोड करणाऱ्या बाजीलालचे होते. शेततळ्यात बुडालेल्या हर्षाला वाचविण्यासाठी उतरलेल्या बाजीलालचा अखेर अंत झाला. या दोघांचे मृतदेह सोमवारी सकाळी ९ वाजता शेततळ्यातून काढण्यात आले.
पोलीस सूत्रांनुसार, कुष्टा शिवारातील हरिदास नाथे यांच्या शेतातील शेततळ्यात रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास गावातील हर्षली विनोद वांगे (१३) बुडाली. तिला वाचविण्यासाठी उतरलेला बाजीलाल मुन्ना कासदेकर (२५) हादेखील बुडाला. त्यांच्यासमवेत असलेल्या तरुणाने या दोघांना वाचविण्यासाठी उडी घेतली. तो गटांगळ्या खात असल्याचे पाहून नागरिकांनी त्याला वाचविले. सोमवारी सकाळी दोघांचे मृतदेह बचाव पथकाने शोधून पाण्याबाहेर काढले. पथ्रोट पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरिता अचलपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदनानंतर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, नाथे यांच्या शेतात बाजीलाल यांचे वडील मुन्ना कासदेकर रखवालदार आहेत. या शेतातील शेततळ्याभोवती चित्रीकरण करून बाजीलाल हा इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचा. रविवारी सायंकाळी हर्षा ही बहीणीसोबते फोटोसेशन करीत असताना पाय घसरून पाण्यात पडली. बहिणीने शेतात काम करणारा बाजीलाल याला मामा वाचवा, अशी साद घातली. बाजीलाल धावत तळ्यात उतरला परंतु तिला वाचवताना बाजीलालदेखील बुडाला. हर्षालीच्या पश्चात दोन बहिणी तर मृत युवकास एक भाऊ आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार अशोक पळस्पगार, हेमंत येरखडे, नरेश धाकडे, विजय गायकवाड करत आहे.
सब्र कर मेरी जान...
बाजीलालने रविवारी आभासी माध्यमावर चित्रफीत टाकली. त्यात ‘सब्र कर मेरी जान... किस्सा नही... अपनी कहानी होगी’ अशा आशयाचा मजकुर त्याच्या तोंडी आहे. काळाला मात्र ‘सब्र’ झाले नाही. त्याने मित्रवर्गातून या उमद्या व्यक्तिमत्त्वाला हिरावून नेले.