तो अवचित म्हणाला, चल पळून जाऊ! तिने नकार देताच केली मारहाण अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:59 PM2021-12-26T17:59:23+5:302021-12-26T18:08:41+5:30
त्याने तिला रस्त्यात अडवले व आताच माझ्या गाडीवर बस, चल आपण लग्न करू, अशी बतावणी केली. तिने नकार देताच त्याने तिला बळजबरीने दुचाकीवर बसविले. पुढे नकार दिल्याने तिला चालत्या दुचाकीवरून खाली ढकलून दिले. यात ती गंभीर जखमी झाली.
अमरावती : तिच्या ध्यानीमनी नसताना तो अचानक सामोरा आला. ‘चल पळून जाऊन लग्न करू’, असा म्हणाला. नकार देताच त्याने तिला बळजबरीने दुचाकीवर बसविले. पुढे नकार दिल्याने तिला चालत्या दुचाकीवरून खाली ढकलून दिले. यात ती गंभीर जखमी झाली. ही थरारक घटना एका खेड्यात घडली.
फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या परिचयातील आहेत. दरम्यान, २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तरुणी ही तिच्या मामीसोबत मैत्रिणीकडे जात होती. दरम्यान, अमित दादाराव वानखडे (२१, नांदुरा पिंगळाई, ता. मोर्शी) हा तिला रस्त्यात भेटला. आताच माझ्या गाडीवर बस, चल आपण लग्न करू, अशी बतावणी त्याने केली. तिने नकार दिला असता, त्याने तिला मारहाण केली व बळजबरीने दुचाकीवर बसविले. दुचाकी थांबव, मला उतरायचे आहे, उतरवून दे, अशी विनवणी तिने केली. मात्र, दुचाकी न थांबवता त्याने तिला ढकलून दिले. त्यामुळे तिच्या डाव्या खांद्यासह डोक्याच्या मागील बाजूला गंभीर दुखापत झाली.
लग्न होऊ देणार नाही
ढकलून देऊन अमितने दुचाकी थांबविली. तथा माझ्याशी लग्न करणार नसशील, तर तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे त्या तरुणीने वलगाव पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अमित वानखडे (नांदुरा पिंगळाई) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वलगाव ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सावरकर हे करीत आहेत.