पहिली असताना ‘दुसरी’सोबत चढला बोहल्यावर; नांदगावच्या ‘लखोबा’विरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 05:43 PM2022-05-02T17:43:11+5:302022-05-02T17:57:53+5:30
तरुणीची मनोज मानतकरशी ओळख होती. तिची शैक्षणिक कागदपत्रेदेखील त्याच्याजवळ होती. ती परत करतो, अशी बतावणी करून आरोपीने तिला बळजबरीने वाहनामध्ये बसवून अमरावतीला आणले.
अमरावती : आधीच विवाहित असल्याचे दडवून ठेवत एकाने दुसऱ्याच तरुणीशी रजिस्टर मॅरेज केल्याचा धक्कादायक प्रकार नांदगाव खंडेश्वर येथे उघड झाला. नांदगाव पोलिसांनी ३० एप्रिल रोजी रात्री ११.०३ वाजता त्या ‘लखोबा’विरुद्ध गुन्हा दाखल केला. मनोज मानतकर (रा. वाॅर्ड क्रमांक ६, नांदगाव खंडेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. यात अन्य एका अनोळखीविरुद्ध देखील गुन्हा नोंदविण्यात आला.
तक्रारीनुसार, पीडित २४ वर्षीय तरुणीची मनोज मानतकरशी ओळख होती. तिची शैक्षणिक कागदपत्रेदेखील त्याच्याजवळ होती. ती परत करतो, अशी बतावणी करून आरोपीने तिला बळजबरीने वाहनामध्ये बसवून अमरावतीला आणले. २८ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्याने तिला अमरावतीला आणताना काही तरी गुंगीचे औषध दिले तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. सायंकाळच्या सुमारास त्याने आपल्याला नांदगावात सोडल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे.
असा झाला उलगडा
अमरावतीहून परतल्यानंतर पीडित तरुणीला तिच्या व्हाॅट्सॲपवर तिचे व मनोज मानतकरच्या लग्नाचे प्रमाणपत्र दिसले. त्यानंतर तिला २८ एप्रिलचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला. आरोपीने लग्नाची बतावणी करून लग्न प्रमाणपत्रावर आपली स्वाक्षरी घेतल्याचे तिच्या लक्षात आले. मनोज मानतकर हा आधीच विवाहित असताना आपल्याशी लग्न करून त्याने आपल्याला फसविल्याचेही तिच्या लक्षात आले. सबब, तिने ३० एप्रिल रोजी नांदगाव पोलीस ठाणे गाठून त्याच्यासह अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी मानतकर व एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
२४ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून येथील मनोज मानतकर नामक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो फरार झाला आहे. अटक व चौकशीनंतर तथ्यांचा उलगडा होईल. ते लग्न अमरावतीला कुठल्याशा संस्थेत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
- हेमंत ठाकरे, ठाणेदार, नांदगाव खंडेश्वर