सासरच्या जाचाला कंटाळून घरजावयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 03:14 PM2021-12-05T15:14:47+5:302021-12-05T15:22:19+5:30
विकासला आई-वडील नाही. त्याचे पालनपोषण आजी-आजोबांनी केले आहे. लग्न झाल्यानंतर पत्नीच्या गावी घरजावई म्हणून तो राहत होता. आजी-आजोबांना भेटायला तो सातेगावला जात होता. यावरुन त्याची पत्नी व सासू-सासरे त्याचाशी वाद घालत असत.
अमरावती : वनोजा बाग तालुक्यातील कापूताळणी येथे घरजावयाने पत्नी व सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते. १० दिवसांच्या उपचारानंतर त्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या आजीच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, विकास राजेश इंगळे (२३, रा. सातेगाव) असे मृताचे नाव आहे. २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५:३० च्या सुमारास त्याने कापूसतळणी येथे सासरी स्वत:ला जाळून घेतले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचा २ डिसेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकासला आई-वडील नाही. त्याचे पालनपोषण आजी-आजोबांनी केले आहे. लग्न झाल्यानंतर पत्नीच्या गावी घरजावई म्हणून तो राहत होता. आजी-आजोबांना भेटायला तो सातेगावला येत होता. तथापि, त्याची पत्नी व सासू-सासरे सातेगावला जाण्यास मनाई करून वाद घालत असत.
याप्रकरणी आजी इंदुबाई समाधन इंगळे (६०, रा. सातेगाव) यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विकासला त्याची पत्नी, सासू, सासरे सातेगावला जाण्याच्या मुद्द्यावर त्याला मारहाणदेखील करीत होते. याच जाचाला कंटाळून विकासने आत्महत्येचे पाऊल उचलले. इंदुबाई यांच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी पत्नी आरती (२१), सासरे प्रमोद महादेव वानखडे (४५) व सासू वंदना (४५, सर्व रा. कापूसतळणी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३०६, ५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात होत आहे. घटनास्थळाला ३ डिसेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांनी भेट दिली. पोलिसांनी अटक केल्यानंतर तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.