मुलगी झाल्याने माहेरी पाठविले, त्याने दुसरे लग्न केले!
By प्रदीप भाकरे | Published: January 6, 2024 04:39 PM2024-01-06T16:39:13+5:302024-01-06T16:39:54+5:30
रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न, १० लाख रुपयांसाठी छळ.चार वर्ष चालली कौटुंबिक छळाची मालिका.
प्रदीप भाकरे,अमरावती: मुलाऐवजी मुलगी झाल्याने पतीने पत्नीला माहेरी पाठवून देत तिच्या अपरोक्ष चक्क दुसरे लग्न केले. हा धक्कादायक प्रकार व्हिएमव्ही परिसरातील एका वसाहतीत घडला. ७ एप्रिल २०१९ ते आजतागायत ती छळ मालिका चालली. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी ५ जानेवारी रोजी तिच्या पतीसह अन्य चौघांविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.
आरोपींमध्ये सैय्यद अथर, तीन महिला व शेख साकिब (सर्व रा. पांढरी हनुमान मंदिर, व्हीएमव्ही परिसर) यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेच्या लग्नाला पाच वर्ष झाले असून त्या दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर तिच्या चारही नणंद व नंदईने तिला माहेरवरुन पैसे आण, असे म्हणून त्रास देणे सुरू केले. त्यामुळे पिडिताच्या वडिलांनी आरोपीने मागितल्यानुसार त्यांना वेळोवेळी रक्कम दिली. मात्र तिचा छळ सुरूच राहिला. दरम्यानच्या काळात ती गर्भवती असताना तिच्या चारही नणंदा व सासुने तुला मुलगाच झाला पाहिजे, असा आग्रह धरला. नणंदा, सासू व अन्य आरोपींनी तिला मारहाण करुन तिच्या अंगावर रॉकेल देखील टाकले.
घराबाहेर काढून मारहाण :
दरम्यान फिर्यादीला मुलगी झाली. तेव्हा सासरचे कुणीही भेटायला आले नाही. सहा महिन्यानंतर आरोपी तिला भेटायला आले. आपसी बैठक घेवून ३० हजार रुपयांची मागणी केली. ते पैसे दिल्यानंतर तिला माहेरी नेले. त्यानंतर लगेच दोन दिवसांनीच तुला मुलगी झाली. तुझ्या वडिलांनी एक प्लॉट घेवून माग, नाहीतर,१० लाख रुपये माग, असे म्हणून घराबाहेर काढले. तथा मारहाण देखील केली. ती बाब काही शेजाऱ्यांनी पिडिताच्या भावाला सांगितली. त्याला देखील मारहाण करण्यात आली. तिला तब्बल चार वर्ष माहेरी ठेऊन तिच्या पतीने चक्क दुसरे लग्न केले. ती बाब माहित होताच तिने पोलीस ठाणे गाठले.