‘नरभक्षी’चा सातपुडा टायगर रिझर्व्हच्या सीमेवर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:17 PM2018-12-08T12:17:08+5:302018-12-08T12:20:05+5:30
जिल्ह्यात १२ दिवस प्रचंड दहशत पसरवून मध्यप्रदेशच्या जंगलात कूच करणारा नरभक्षी वाघ सातपुडा टायगर रिझर्व्हच्या सीमारेषेवर ठाण मांडून आहे.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्ह्यात १२ दिवस प्रचंड दहशत पसरवून मध्यप्रदेशच्या जंगलात कूच करणारा नरभक्षी वाघ सातपुडा टायगर रिझर्व्हच्या सीमारेषेवर ठाण मांडून आहे. ३५ दिवसांत जवळपास १६ पाळीव गुरांची शिकार त्याने केली. या परिसरातच स्थिरावण्यासाठी त्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती असून, त्याच्या प्रत्येक हालचालीवर मध्य प्रदेश वनविभागाचे अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
अमरावती जिल्ह्यात १८ ते ३० सप्टेंबर दरम्यान चंद्रपूर येथून आलेल्या अडीच वर्षीय वाघाने दहशत माजवली होती. दोन माणसांसह चार गुरांचा त्याने फडशा पाडला. चंद्रपूरहून मध्यप्रदेशपर्यंत त्याची उत्तर दिशेने वाटचाल कायमच आहे. १ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशच्या जंगलात नरभक्षी शिरला. तो सातपुडा टायगर रिझर्व्हच्या सीमारेषेपर्यंत पोहोचला असून, यादरम्यान त्याने फक्त पाळीव जनावरांच्या शिकारी केल्या; कुठल्याच माणसावर हल्ला केला नसल्याचे मध्य प्रदेश वनविभागाच्या बैतूल उत्तर झोनचे उपवनसंरक्षक अशोक कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मनमौजी आहे धारीवाला वाघोबा
मध्य प्रदेश वनविभागाच्या जंगलात शिरलेल्या या युवा वाघाची ओळख ‘धारीवाला वाघोबा’ म्हणून झाली आहे मध्य प्रदेशातील वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी त्याच्या अंगावरील पट्ट्यांवरून त्याला ओळखतात. मागील ३५ दिवसांपासून त्याचे दिवसभराचे लोकेशन घेतले जाते. मनात आले, तर एकाच परिसरात दोन ते तीन दिवस मुक्काम ठोकतो, अन्यथा पुढील प्रवासाला निघतो. मध्य प्रदेशातील जंगलात स्थिरावण्याचा भरपूर वाव असल्याने आणि राजस्थानातील जंगलाचे ३०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याने हा परिसर सोडून जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळून लावली.
सारणी शहराजवळ चार दिवस मुक्काम
पलासपानीनंतर वन्यमार्गाने चालत अनेक खेड्यांतून वाघाने प्रवास केला. स्थानिक रहिवाशांना त्याचे दर्शनही झाले. चार दिवसांपासून सारणी शहराजवळच त्याने मुक्काम ठोकला होता. होशंगाबाद-बैतुल जिल्हा सीमेवरील सातपुडा टायगर रिझर्व्हनजीक हा धारीवाला वाघोबा पोहोचला. वनविभागाने आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
शिकाऱ्यांवर करडी नजर
मध्यप्रदेश वनविभागाने शिकाऱ्यांवरसुद्धा लक्ष केंद्रित केले आहे. वाघाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच प्रकारच्या सुरक्षा सूचना वनकर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तो पुन्हा आल्या मार्गाने किंवा दिशा बदलून पुढचा प्रवास करण्याची शक्यतासुद्धा सूत्राने वर्तविली.
वाघाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत त्याने जवळपास १६ पशूंंची शिकार केली. सातपुडा टायगर रिझर्व्हच्या सीमेवर तो आहे.
अशोक कुमार, उपवनसंरक्षक, बैतूल उत्तर (मध्यप्रदेश)