Amravati | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षांचा कारावास
By प्रदीप भाकरे | Published: August 29, 2022 05:19 PM2022-08-29T17:19:40+5:302022-08-29T17:22:51+5:30
सप्टेंबर २०२० मधील घटना, अपहरणाचा गुन्हा सिद्ध
अमरावती : एका नऊ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास, १६ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने २९ ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला. ११ सप्टेंबर २०२० रोजी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी ही घटना घडली होती. विशाल अशोकराव बालबेल (३१) रा. बडनेरा असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
दोषारोपपत्रानुसार, ११ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी नऊ वर्षीय मुलगी मोठ्या आईकडून पायदळ आपल्या घरी जात होती. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या विशालने तिला माझ्यासोबत शेतात चल; तुला फुल तोडून देतो, असे म्हटले. मात्र, पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यावर विशालने तिला पकडून जबरीने शेतात नेले. या ठिकाणी त्याने पीडित मुलीवर अतिप्रसंग केला. घटनेनंतर पीडित मुलीने आईजवळ आपबिती कथन केली. बडनेरा पोलिसांनी आरोपी विशालविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणात न्या. ए. एस. काझी यांच्या न्यायालयात सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विशालला अपहरण व पोस्कोअन्वये नोंदविलेल्या गुन्हयात शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दीपक मा. आंबलकर यांनी युक्तीवाद केला. तर पैरवी अधिकारी म्हणून हेकॉ संतोष चव्हान यांनी कामकाज हाताळले. अंमलदार अरूण हटवार यांनी सहकार्य केले.