बच्चूभाऊ, मला वाचवा हो! आमदारांना भेटण्याकरिता 'त्याने' घेतली विहिरीत उडी, नंतर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 01:10 PM2022-11-24T13:10:45+5:302022-11-24T13:15:07+5:30
हात-पाय धरून उचलून त्याला सुरक्षित ठिकाणी नेत असताना तो बदलला आणि प्रशासकीय यंत्रणेवरच उलटला.
परतवाडा (अमरावती) : आमदारांना भेटण्याकरिता एका व्यक्तीने चक्क विहिरीत उडी घेतली. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही; पण ते तेवढेच खरे आहे. २२ नोव्हेंबरला ही घटना परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंतर्गत कांडली परिसरात घडली.
विहिरीत उडी घेणाऱ्याचे नाव रमेश चिराटे (४५, रा. सुरवाडी, ता. चांदूर बाजार), असे आहे. विहिरीत उडी घेतल्याचे समजताच त्याला बाहेर काढण्याकरिता परतवाडा पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मला आमदार बच्चू कडू यांना भेटायचे आहे, असे त्याने स्पष्ट केले. संबंधितांनी त्याला विहिरीबाहेर येण्याची विनंती केली; पण तो मागणीवर ठाम राहिला. हे बघून प्रशासकीय यंत्रणेने त्याला जबरीने विहिरीबाहेर काढले.
हात-पाय धरून उचलून त्याला सुरक्षित ठिकाणी नेत असताना तो बदलला आणि प्रशासकीय यंत्रणेवरच उलटला. बच्चूभाऊ मला वाचवा. हे लोक मला विहिरीत टाकत आहेत, असे ओरडून सांगू लागला. बच्चूभाऊ वाचवा, असा सूर लावणाऱ्या या इसमाला पोलिसांच्या ‘बाजीराव’चा प्रसाद मिळाला. यानंतर तो शांत झाला. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली. यानंतर कलम १४९ ची नोटीस देऊन त्यास त्याच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले. थरारक; पण तेवढ्याच मनोरंजनपर या घटनेचा अखेर सुखद शेवट झाला.