जादूटोण्याच्या संशयावरून मुलाचे डोके सटकले; जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 05:59 PM2022-02-09T17:59:17+5:302022-02-09T18:23:25+5:30
एकुलता एक असलेला अभिषेक मनोरुग्ण व गतिमंद असल्याचे सांगितले जाते. त्याचा हा कथित आजार दूर करण्याकरिता विष्णुपंत टाकरखेडे पत्नीसह खासगी वाहनाने अभिषेकला घेऊन राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात गेले होते.
वरूड (अमरावती) : राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील मेहंदीपूर बालाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैरवमंदिरात जाताना तीन पहाडी भागातील वर्दळ नसलेल्या जागी मुलाने वडिलांची दगडाने ठेचून हत्या केली. स्थानिक लक्ष्मीनगर परिसरातील टाकरखेडे कुटुंब स्वतःच्या एकुलत्या एक मनोरुग्ण मुलाला घेऊन राजस्थानमध्ये देवदर्शनाला गेले होते. यादरम्यान मुलाच्या मनात तंत्रमंत्राच्या संशयावरून वडिलांविषयी शंका उत्पन्न झाल्याने ८ फेब्रुवारीला ही घटना घडली. आई आणि चालकही पित्याला वाचवू शकले नाही. बुधवारी मृतदेह वरुडात आणण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, विष्णुपंत टाकरखेडे (६२, रा. लक्ष्मीनगर, वरूड) असे मृत पित्याचे नाव आहे. अभिषेक (२२) असे आरोपी मुलाचे नाव आहे. एकुलता एक असलेला अभिषेक मनोरुग्ण व गतिमंद असल्याचे सांगितले जाते. त्याचा हा कथित आजार दूर करण्याकरिता ५ फेब्रुवारीला विष्णुपंत टाकरखेडे, पत्नी हेमलता (५५) व चालक विजय हे खासगी वाहनाने अभिषेकला घेऊन राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात गेले होते.
अनेक मंदिरात देवदर्शन करून ८ फेब्रुवारीला ते मेहंदीपूर बालाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन पहाडी भागातील भैरव मंदिरात दर्शनाला गेले होते. तिथे माझ्यावर अकारण तंत्र-मंत्र करता का, असे म्हणत अभिषेकने दगडाने ठेचून विष्णुपंत यांना ठार केले. अभिषेकचा रुद्रावतार पाहून हेमलता व विजय यांच्या तोंडून शब्दही निघाला नाही. विष्णुपंत यांना वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न फोल ठरला. अभिषेकलाही ते आवरू शकले नाहीत.
राजस्थानमधील बालाजी पोलिसांनी प्रभारी ठाणेदार गिरराज यांच्या नेतृत्वात घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अभिषेकला अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली. मला कसलाही आजार नाही. मात्र, मनोरुग्ण समजून होत असलेल्या उपचारांमुळे मी त्रस्त झालो होतो. त्यातून ही घटना घडली, असे त्याने पोलिसांना सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह हेमलता व विजय यांनी रुग्णवाहिकेतून बुधवारी साडेअकरा वाजता घेऊन लक्ष्मीनगर येथे आणला.
अभिषेक राजस्थानात अटकेत
विष्णुपंत यांनी अभिषेकचा कथित आजार दुरुस्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. किराणा दुकानसुद्धा लावून दिले होते. दौसा येथील देवदर्शन हा त्यांच्यासाठी अखेरचा उपाय ठरला.