व्हॉट्सॲप ‘डीपी’वरील फोटो पॉम्प्लेटवर लिहिले, 'यह लडकी कॉलगर्ल है!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 11:06 AM2021-12-20T11:06:51+5:302021-12-20T11:37:29+5:30
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने घराशेजारी दुकानाच्या शटरवर पॉम्प्लेट चिटकवून, त्यावर त्या तिचा व्हॉट्सॲप डीपीवरील फोटो टाकून त्याखाली 'यह लडकी कॉलगर्ल है!' असे लिहीले
अमरावती : समाज माध्यमावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीने घराशेजारी दुकानाच्या शटरवर पॉम्प्लेट चिटकवून, त्यावर त्या मुलीचा व्हॉट्सॲप डीपीवर असलेला फोटो टाकून त्याखाली 'यह लडकी कॉलगर्ल है!' असे अश्लाघ्य लिहिल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.
एक महिन्याआधी बेलपुरा भागात हा प्रकार घडल्याची तक्रार एका महिलेने १८ डिसेंबर रोजी राजापेठ पोलिसांत नोंदविली आहे. त्यावरून प्रीतमसिंग वीरेंद्रसिंग तंवर (२३, रा. कलोथ्रा, जि. बुहाना, राजस्थान) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी प्रीतमसिंग हा वेगवेगळ्या क्रमांकाहून आपल्याशी संपर्क साधून रिपोर्ट परत घे, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे पीडिताने म्हटले आहे. त्याच्या तशा वागण्यामुळे आपली दैनंदिन कामे प्रभावित होत असल्याचेही तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे आरोपी प्रीतमसिंगविरुद्ध पीडिताच्या तक्रारीवरून याआधी नागपूर येथे यंदाच बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
तक्रारीनुसार, यातील पीडिताची सन २०१९ मध्ये समाजमाध्यमाद्वारे प्रीतमसिंगशी ओळख झाली. त्याने पीडितावर बलात्कारदेखील केला. तक्रारीच्या पाच दिवसानंतर पीडिताच्या आईच्या फोनवर संपर्क साधत त्याने पीडितावर ॲसिड फेकून इजा पोहचविण्याची धमकीदेखील दिली. ती तक्रार येथील राजापेठ पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. त्यानंतर आरोपीचा जावई व भाच्याने पीडिता व तिच्या आईसोबत संपर्क साधून तक्रार दाखल करू नकोस, आम्ही तुमचे लग्न लावून देऊ, अशी बतावणी केली. त्यावर विश्वास ठेवून पीडिताने त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली नव्हती.
अन् ती नखशिखांत हादरली
सप्टेंबरमध्ये पीडितेला तिच्या घराशेजारच्या दुकानाच्या बंद शटरवर तिचा व्हॉट्सॲप डीपी असलेला फोटो दिसला. तेथे एक महिला असे मोठ्या अक्षरात लिहून त्याखाली 'यह लडकी कॉलगर्ल है!' असे लिहिलेले आढळले. त्याखाली संपर्कासाठी पीडिताचाच मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आला होता. त्यामुळे ती नखशिखांत हादरली. त्यानंतरही त्याचा जावई व भाचा आपल्याला राजस्थानला बोलावत आहेत, तर प्रीतमसिंग हा रिपोर्ट परत घे, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार पीडिताने नोंदविली. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी १८ डिसेंबर रोजी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.