‘लिव्ह इन’मधून झाली मुलगी; मग म्हणाला ‘तो मी नव्हेच’!
By प्रदीप भाकरे | Published: September 29, 2022 06:01 PM2022-09-29T18:01:07+5:302022-09-29T18:08:40+5:30
लैंगिक शोषण : १३ वर्षानंतर झाले ‘ब्रेकअप’, लग्नाची टाळाटाळ पोहोचली पोलीस ठाण्यात
अमरावती : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असताना त्या दाम्पत्याला एक मुलगी देखील झाली. मात्र, त्याने त्यानंतर देखील पूर्वीसारखीच लग्नाच्या नावावर टोलवाटोलव केली. समाजही मुलीचा पिता विचारू लागले. त्यामुळे तिच्या संकटात नवी भर पडली. त्यामुळे तिने लग्नाचा तगादा आणखी वाढविला. मात्र, तब्बल १३ वर्षांची ‘रिलेशनशिप’ एका झटक्यात मोडत त्याने तिला मारहाण केली. शिव्यांची लाखोली वाहिली. अखेर २८ सप्टेंबर रोजी उशिरा रात्री तिने राजापेठ पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मनीष सुधाकर मानमोडे (३१, सोनार मंगल कार्यालय, न्यु गणेश कॉलनी, अमरावती) याच्याविरूध्द बलात्कार, छळ, मारहाण व शिविगाळ केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये प्रत्यक्ष संवाद वाढला. फोन कॉल्स सुरु झाले. त्यामुळे त्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या पतीला देखील माहित झाले. त्यामुळे त्याने तिला सोडले. त्यावेळी आरोपी मनीष याने ‘मै हू ना’ स्टाईलने तिला धीर दिला. जून २००९ ते आतापर्यंत ती छळमालिका चालली.
भांगेत कुंकू भरतो, लग्नही करतो
पतीने सोडल्यामुळे आरोपी तिला न्यु गणेश कॉलनी येथील घरी घेऊन आला. तुझ्या भांगेत कुंकू भरतो, लग्नही करतो, असे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ते दोघे गोपालनगर येथे लिव्ह इन’मध्ये राहत होते. तेथे देखील तिने आरोपीला लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. त्यावेळी वडिलांच्या तब्येतीची कारणे देऊन त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शोषण करण्यात आले. त्यातून तिने एका मुलीला देखील जन्म दिला. लग्नाचे नाव काढताच तिला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली.
जून २००९ पासूनचा तो एकंदिरत घटनाक्रम आहे. मुलगी झाल्यानंतरही आरोपीने लग्नास टाळाटाळ चालविल्याची तिच्या तक्रारीत नमूद आहे. त्यावरून आरोपीविरूध्द गुन्हे दाखल केले.
प्रशाली काळे, सहायक पोलीस निरिक्षक, राजापेठ