कलेतून तो देतोय देशभक्तीचे धडे, एक हजार विद्यार्थ्यांना शिकविली पेंटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 02:24 PM2018-01-29T14:24:14+5:302018-01-29T14:24:19+5:30

man taught painting to one thousand students | कलेतून तो देतोय देशभक्तीचे धडे, एक हजार विद्यार्थ्यांना शिकविली पेंटिंग

कलेतून तो देतोय देशभक्तीचे धडे, एक हजार विद्यार्थ्यांना शिकविली पेंटिंग

Next

- मोहन राऊत
अमरावती- राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वीर, महापुरुष यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून त्यांची जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीयदिनी प्रत्येक शाळेत जाऊन रांगोळी तसेच पेंटिंगच्या माध्यमातून देशभक्तीचे दर्शन घडविण्याचे अविरत कार्य तो सात वर्षांपासून करीत आहे. या माध्यमातून अगदी अल्प वयातच त्याने विद्यार्थ्यांमधील चित्रकलेच्या गुणांना उजाळा दिला. 
विद्यानगरी धामणगावातील शिवाजी वॉर्डस्थित रहिवासी आणि आदर्श महाविद्यालयात इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या सुशांत प्रकाश जयस्वालचा प्रवास आगळा आहे़ नाविन्याची आस व देशभक्तीची आगळी गुंफण या छंदवेड्या विद्यार्थ्याने आपल्या प्रयत्नांतून साध्य केली आहे. इयत्ता पाचवीपासून सुशांत हा प्रत्येक शाळेत जाऊन महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी यानिमित्त तेथील गरीब विद्यार्थ्यांना रांगोळी व पेंटिंगद्वारे विद्यार्थ्यांकडून चित्र काढून घेतो. आतापर्यंत त्याने अमर शहीद भगतसिंह, लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ़ ए़पी़जे़ अब्दुल कलाम, इंदिरा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे चित्र काढण्याची कला विद्यार्थ्यांना शिकविली आहे. पाने-फुले, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक, बुद्धांची ध्यानस्थ मुद्रा, हरणाचा कळप तसेच धार्मिक विषयांना स्पर्श करणारी चित्रे विद्यार्थ्यांना तो शिकवितो. गरीब विद्यार्थ्यांकडे चित्र काढण्यासाठी साहित्य नसल्यास कधी आपल्या मित्रांचे व वडिलांचे सहकार्य घेऊन स्वत:च्या खर्चातून रंग, कॅनव्हास, ब्रश, डिश, पेपर, माऊंट पेपर, स्केचपेन, रंगीत पेन्सिल, ड्रॉइंग बोर्ड अशी साहित्य उपलब्ध करून देऊन कलेची आवड निर्माण करून देण्याचे काम सुशांत जयस्वाल करीत आहे. आतापर्यंत एक हजार विद्यार्थ्यांनी ही पेंटिंग व चित्रकलेची आवड त्याच्या माध्यमातून जोपासली आहे.

Web Title: man taught painting to one thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.